बेळगाव लाईव्ह :यंदाच्या एसएसएलसी परीक्षेत हेरवाडकर हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल साईश अमोल देसाई या गुणवंत विद्यार्थ्यांचा बेळगाव दक्षिण विभाग नागरीक हितरक्षण समितीतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला.
बेळगाव कृषी पतीन संस्थेचे चेअरमन अमोल पांडुरंग देसाई यांचा चिरंजीव असलेला साईश हा यंदाच्या एसएसएलसी अर्थात दहावीच्या परीक्षेत हेरवाडकर हायस्कूल या आपल्या शाळेत सर्वाधिक 98.4 टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे. याबद्दल बेळगाव दक्षिण विभाग नागरिक हितरक्षण समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य अरविंद हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या अन्य पदाधिकारी व सदस्यांनी बेळगाव कृषी पतीन संस्थेचे चेअरमन अमोल देसाई यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी नागरी हितरक्षण समितीच्यावतीने प्राचार्य हलगेकर यांनी परीक्षेतील घवघवीत यशाबद्दल साईश याचे अभिनंदन करून सत्कार केला.
यावेळी बोलताना सेवानिवृत्त प्राचार्य अरविंद हलगेकर यांनी साईश अमोल देसाई यांच्या यशाचे मुक्तकंठाने कौतुक केले. त्यांनी प्रथम देसाई कुटुंबाचे अभिनंदन करताना आई-वडिलांचे संस्कार व आशीर्वाद याशिवाय साईशला यश मिळणे शक्य नव्हते असे सांगितले.
तसेच देवपूजेपासून आपल्या आईला घरातील प्रत्येक कामात मदत करणारी साईश याच्यासारखी मुलं आजच्या पिढीत दुर्मिळ आहेत. याबद्दलही आम्हाला त्याचे कौतुक आहे असे सांगून तू तुझी या यशाची कमान अशीच उंचावत ठेवून पुढे आयआयटीत प्रवेश घ्यावा आणि आयआयटीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर देशसेवेसाठी यूपीएससी करावी अशी माझी इच्छा आहे, असे प्राचार्य अरविंद हलगेकर म्हणाले.
याप्रसंगी साईशचे आई-वडील अमोल व आदिती देसाई यांच्यासह सुरेखा पांडुरंग देसाई, कीर्तीकुमार कुलकर्णी, मनोहर हलगेकर, भाऊराव पाटील, देवकुमार बिर्जे, माधुरी राजू बिर्जे, प्रकाश औंधकर आदी उपस्थित होते.





