बेळगाव लाईव्ह: शेतकऱ्यांच्या हितासाठी वाढवण्यात आलेले पेट्रोल व डिझेलचे दर, तसेच खतांचे दर कमी करून नियंत्रणात ठेवावेत अशी विनंती आम्ही केंद्र आणि राज्य सरकारला करत आहोत, अशी माहिती भारतीय कृषक समाजाचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष बसवराज मोकाशी यांनी दिली.
बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. अध्यक्ष बसवराज मोकाशी म्हणाले की, युद्धाचे कारण पुढे करून पेट्रोल आणि डिझेल दरवाढ करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. इंधन व इतर गोष्टी महाग होत असताना शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांचा बाजार भाव मात्र घसरत चालला आहे.
खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना नगण्य लाभ होत आहे. तेेंव्हा शेतकऱ्यांवर प्रतिकूल परिणाम होत असल्यामुळे आमची केंद्र व राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी पेट्रोल व डिझेल या इंधनांचे दर कमी करून ते नियंत्रण ठेवावे. त्याचप्रमाणे जमिनीचे सातबारा उतारे एकत्र केले जात आहेत. तसे न करता एका सर्व्हे नंबरमध्ये किती सातबारा उतारे असतील ते सगळे काढले जावेत. पूर्वी 15 रुपयाला सातबारा उतारा काढून मिळत होता त्यासाठी आता 200 -300 रुपये खर्च येत आहे. हे थांबवून सरकारने स्वतंत्र उतारे काढून दिले पाहिजेत.
खेडेगावांमध्ये ई -स्वत्तू उतारे काढून दिले जात नाही. पूर्वी 100 रुपयांच्या बॉण्डवर मालकी हक्काने घरे घेऊन त्यामध्ये गेली 30 -40 वर्षे झाले सर्व प्रकारचे कर भरून राहत असलेल्या लोकांना आता मूळ मालकाकडून कार्यालयाच्या माध्यमातून खरेदीपत्र घेऊन येण्यास सांगितले जात आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ई -स्वत्तू उतारे सर्वांना उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. तसेच सातबारा उतारे स्वतंत्र दिले जावेत.
याव्यतिरिक्त सध्या खताचे दर वाढत असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नांना मिळणारा दर कमी होत चालला आहे. सरकारचे खताच्या दरांवर ही नियंत्रण नाही. बाजारात शेतकऱ्यांना त्यांना हवे असलेले खत मिळत नाही त्याऐवजी दुकानदार जे खत देईल ते घ्यावे लागते, ही कोणती पद्धत झाली? याकडे कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन खत इकडे त्यांना समज देऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे. शेतकऱ्यांना हवे असलेले खत अथवा औषधेच दुकानदाराने दिली पाहिजेत मात्र सध्या असे न होता टंचाईचे कारण पुढे करून बियाणे, खत व औषधं दर वाढवून विकली जात आहेत.
आता पेरणीचा हंगाम सुरू होणार असल्यामुळे याची गांभीर्याने दखल घेऊन ताबडतोब कार्यवाही केली जावी अशी मागणी करून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी जिल्हाधिकारी व कृषी अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी विनंती शेवटी जिल्हाध्यक्ष बसवराज मोकाशी यांनी केली. पत्रकार परिषदेस भारतीय कृषक समाजाचे अन्य स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.




