बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरात आज सकाळी एक थरारक घटना घडली. भररस्त्यात एका युवकाच्या दुचाकीमध्ये नागसापाचे विषारी पिल्लू आढळल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी प्रसंगावधान राखत त्या सापाला सुरक्षितरीत्या पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय नावाचा युवक आपल्या एक्सेस दुचाकीवरून जात असताना अचानक एक साप त्याच्या हातावर चढला. हा प्रकार लक्षात येताच घाबरलेल्या अक्षयने तात्काळ दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली. मात्र काही क्षणातच तो साप दुचाकीच्या आतील भागात गायब झाला.
घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र आनंद चिट्टी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मेकॅनिकच्या मदतीने दुचाकीचा समोरील भाग उघडून पाहणी केली. काही वेळ शोध घेतल्यानंतर सापाची शेपटी दिसताच त्यांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्याच क्षणी त्या सापाने फणा काढत जोरदार फुत्कार केला आणि परिसरात एकच खळबळ उडाली.
काही मिनिटांच्या थरारानंतर अखेर आनंद चिट्टी यांनी त्या नागसापाच्या पिल्लाला सुरक्षितपणे पकडले. यावेळी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
याबाबत बोलताना आनंद चिट्टी यांनी हा अस्सल नागसापाचे सुमारे पाच ते सहा दिवसांचे विषारी पिल्लू असल्याचे सांगितले. “पावसाळ्यात विशेषतः जुलै महिन्यात अशा घटना वाढतात. दुचाकींमध्ये उबदार जागा मिळाल्यामुळे साप लपून बसतात. लहान नागसापदेखील आक्रमक असतात, त्यामुळे नागरिकांनी वाहन सुरू करण्यापूर्वी काळजी घ्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.




