बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील रामलिंग खिंड गल्ली परिसरात राहणाऱ्या एका आयुर्वेदिक औषध व्यापाऱ्याला गेल्या 19 मेच्या रात्री तब्बल 20 लाख रुपयांच्या खंडणीची धमकी देण्यात आल्याची तक्रार खडेबाजार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.
शनिवारी खूट येथील ‘जनता आयुर्वेदिक औषध दुकान’ चालवणारे दुर्गराज वैद्य (वय 51) असे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणाऱ्या व्यापाऱ्याचे नांव असून त्यांनी तिघा संशयीतांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.
त्यांच्या तक्रारीनुसार, गेल्या 19 मे रोजी रात्री लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तिघा जणांनी शेट्टी हॉस्पिटलजवळ वैद्य यांची गाडी अडवून त्यांना शिवीगाळ केली. संशयितांनी वैद्य यांच्या आयुर्वेदिक व्यवसायाविरोधात धमक्या देऊन “20 लाख रुपये न दिल्यास गंभीर परिणाम होतील” अशी धमकी दिली.
सदर गुन्ह्यात शारीरिक हानी झाल्याचा उल्लेख नसला तरी वैद्य यांना मानसिक त्रास झाला आणि त्यांनी तत्काळ पोलीस यंत्रणेची मदत घेतली. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी घटनास्थळाच्या सीसीटीव्ही तपासणीसह संशयीतांचा शोध घेण्याचे कार्य हाती घेतले आहे.




