बेळगाव लाईव्ह: क्रीडापटूंच्या अंगातील कौशल्याला हक्काचे व्यासपीठ, नव्या प्रतिभेला प्रोत्साहन आणि कर्नाटकातील क्रीडा संस्कृतीला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने मिशन ऑलिंपिक असोसिएशन कर्नाटक राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राज्यातील २२ जिल्ह्यांमधून ४७० हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतल्याने बेळगावात क्रीडाउत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि हनुमानजींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते कुस्ती लावून स्पर्धेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. खेळाडूंच्या उत्साहाने आणि उपस्थितांच्या प्रतिसादाने उद्घाटन सोहळ्याला विशेष रंगत आली.
या कार्यक्रमाला बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील, पोलीस उपायुक्त एन. व्ही. बरमाणी, धनंजय जाधव, डॉ. सतीश चौलिगेर, विवेक किणयेकर, भारत पाटील, मीना बेनाके, प्रवीण नाईकर आणि अमोल साठे यांच्यासह क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
अतुल शिरोळे यांच्यासह संपूर्ण कमिटीचे नियोजन
मिशन ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अतुल शिरोळे आणि संपूर्ण कमिटीच्या वतीने उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. स्पर्धेचे नियोजन, खेळाडूंचा सहभाग आणि क्रीडा क्षेत्रासाठी उभारण्यात आलेल्या या व्यासपीठाचे उपस्थितांनी कौतुक केले.
बेळगावकरांच्या सहकार्यामुळे खेळाडूंना मोठे व्यासपीठ
या स्पर्धेच्या आयोजनामागे बेळगावातील अनेक व्यक्तींनी मुख्य समर्थक म्हणून खंबीरपणे साथ दिली. त्यांच्या सहकार्यामुळेच खेळाडूंना एवढ्या मोठ्या राज्यस्तरीय व्यासपीठावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी उपलब्ध झाली, असे गौरवोद्गार उपस्थितांनी काढले.
राज्याच्या विविध भागांतून आलेल्या ४७० हून अधिक खेळाडूंचा सहभाग हा स्पर्धेच्या यशाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरला. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते. त्याचबरोबर नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळून भविष्यात मोठ्या स्पर्धांमध्ये चमकण्याचा मार्ग खुला होतो.
मिशन ऑलिंपिक असोसिएशनच्या या उपक्रमामुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली असून, खेळाडूंच्या प्रगतीसाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.





