बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील बहुचर्चित ४ हजार ५०० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावर याला बुधवारी दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सीआयडी कोठडीची मुदत संपल्याने तपास अधिकाऱ्यांनी त्याला न्यायालयासमोर आणले होते.
प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडी अधिकाऱ्यांची विनंती ग्राह्य धरून न्यायाधीश गंगाधर के. यांनी आरोपी शिवानंद नीलण्णावर याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्याचे आदेश दिले.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान शिवानंद नीलण्णावर याने आपल्याला छातीत दुखत असून इतरही आरोग्य समस्या असल्यामुळे योग्य उपचारांची परवानगी द्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली. यावर न्यायाधीशांनी स्पष्ट केले की, कोणतीही आरोग्य समस्या असल्यास वैद्यकीय अधिकारी त्याची तपासणी करून योग्य ते उपचार करतील.

रुग्णालयांमध्ये उत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध असून गरज भासल्यास इतर शासकीय रुग्णालयातही उपचार घेता येतील, तसेच अधिक उपचारांची आवश्यकता असल्यास वकिलामार्फत रीतसर अर्ज सादर करावा, असे न्यायाधीश गंगाधर के. यांनी म्हटले. कारागृहात प्रकृती बिघडल्यास तेथील अधिकारी तत्काळ उपचारांची व्यवस्था करतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
यासोबतच, सदर प्रकरणाचा तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात असल्याने तपास अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करावे, अशी सूचना न्यायालयाने शिवानंद नीलण्णावर याला केली. न्यायालयीन कोठडीचा आदेश झाल्यानंतर काही वेळातच आरोपीला बेळगावमधील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले.




