बेळगाव लाईव्ह :पोक्सो प्रकरणातील साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी देऊन न्यायालयात साक्ष देण्यास प्रतिबंध करणाऱ्या पिरनवाडी येथील एका युवकाला उद्यमबाग पोलिसांनी काल अटक केली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव रोहित विठ्ठल गणाचारी (वय 20, रा. सिद्धेश्वर गल्ली पिरनवाडी बेळगाव) असे आहे. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की शांतीसागर कॉलनी, मजगाव बेळगाव येथील संजय परशुराम नेकनार हे मार्केट पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या एका पोक्सो प्रकरणातील साक्षीदार आहेत.
त्यांनी काल दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोक्सो प्रकरणातील आरोपीशी संबंधित असलेला रोहित विठ्ठल गणाचारी आणि रवी वाघमोटे (रा. सिद्धेश्वर गल्ली, पिरनवाडी) यांनी फिर्यादीदाराने न्यायालयात साक्ष दिल्यास त्याचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी देऊन फिर्यादीदाराच्या मोठ्या भावाला मारहाण केली.
या संदर्भात उद्यमबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी रोहित गणाचारी याला आज शुक्रवारी अटक करून न्यायालयासमोर हजर केले.




