बेळगाव लाईव्ह :मजगाव येथील राहुल तळवार या युवकाच्या गेल्या बुधवारी घडलेल्या खून प्रकरणी जवळपास 14 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून यापैकी एका अल्पवयीन मुलासह 5 जणांना बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक केली आहे, अशी माहिती बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिली.
बेळगाव पोलीस आयुक्तालयामध्ये आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पोलीस आयुक्त बोरसे यांनी सांगितले की, बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गेल्या 27 मे 2026 रोजी तानाजी गल्ली, मजगाव येथील राहुल तिप्पण्णा तळवार या 22 वर्षीय युवकाच्या खुनाची तक्रार नोंदविण्यात आली. ही तक्रार मयत राहुल याचा मित्र विरेश हिरेमठ याने नोंदविली. खुनाच्या घटनेची पार्श्वभूमी अशी की, वीरेश हिरेमठ याने सुरज सिदगवळी याच्याकडून सेकंड हॅन्ड कारगाडी पैसे देऊन खरेदी केली होती. मात्र कांही दिवसानंतर वीरेश हिरेमठ याला कारगाडी त्याला हवी तशी चांगली नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याने ती कार पुन्हा सिदगवळी याच्याकडे सुपूर्द करून कारसाठी दिलेले पैसे परत मागितले. या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून त्यांच्यात वादावादी होत होती. त्यानंतर कारच्या खरेदी व्यवहारासंदर्भात चर्चा करण्यासाठी गेल्या 27 मे रोजी सायंकाळी सुरज सिदगवळी आणि त्याच्या मित्रांनी वीरेश याला हुंचेनहट्टी येथील रामेश्वरनगर, काजू बाग येथे बोलावून घेतले. त्यावेळी झालेल्या चर्चेचे पर्यवसान मारामारीत झाले. त्यावेळी सिदगवळी आणि त्याच्या मित्रानी केलेल्या हल्ल्यात वीरेशचा मित्र राहुल तळवार याच्या डोक्याला व हाताला गंभीर इजा होऊन त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या एफआयआरमध्ये 9 आरोपींसह इतर 4 -5 जणांची नावे नोंद करण्यात आली आहेत. एफवायआर नोंद झाल्याच्या 24 तासात आमच्या बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने 5 प्रमुख आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. आरोपींपैकी चौघांची नावे सुरज सिदगवळी, योगेश दोडमनी, मंजुनाथ मुळकूर आणि देवाप्पा तळवार अशी असून एक अल्पवयीन मुलगा आहे. या सर्वांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे, असे पोलीस आयुक्त बोरसे यांनी शेवटी स्पष्ट केले.




