बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये एका वृद्धाची काळजी घेण्यासाठी नेमलेल्या केअरटेकरकडूनच तब्बल ७३ लाख ३० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा छडा लावून कॅम्प पोलिसांनी दोन आरोपींना अटक करत चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत विश्वनाथ या वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांच्या मुलांनी राहुल कांबळे या तरुणाला कामावर ठेवले होते. घरात सतत वावर असल्यामुळे राहुलने तिजोरीत मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने असल्याची माहिती मिळवली. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत कोणालाही संशय येऊ न देता त्याने तिजोरीतील दागिने हप्त्याहप्त्याने चोरले. तपासादरम्यान त्याने एकूण ९३० ग्रॅम वजनाचे दागिने चोरल्याचे समोर आले आहे.
चोरी केलेले हे सोन्याचे दागिने राहुल कांबळे याने त्याचा सहआरोपी बाबासाहेब कटगेरी याच्या माध्यमातून मथूट फायनान्समध्ये गहाण ठेवून त्यावर पैसे मिळवले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कॅम्प पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक माहिती आणि सुगावा या आधारे मोहीम राबवून राहुल कांबळे व बाबासाहेब कटगेरी या दोन्ही आरोपींना अटक केली.
आरोपींकडून चोरीचे सर्व दागिने जप्त करण्यात आले असून, नागरिकांनी घरात जास्त प्रमाणात सोन्याचे दागिने न ठेवता ते बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावेत, असे आवाहन शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले.
हे प्रकरण अत्यंत कमी कालावधीत उघडकीस आणून आरोपींना अटक केल्याबद्दल शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी कॅम्प पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच या तपासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विभागाकडून योग्य पुरस्कार व बक्षीस देण्याची घोषणा भूषण बोरसे यांनी केली.
या वेळी पोलीस उपआयुक्त नारायण बरमनी आणि पोलीस उपआयुक्त निरंजन राजे अरास यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.




