बेळगाव लाईव्ह : शाळा व अंगणवाड्या पुन्हा सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि अंगणवाड्यांमधील पायाभूत सुविधांची तपासणी करून आवश्यक सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
बेळगावमधील जिल्हा पंचायत सभागृहात शाळा आणि अंगणवाड्यांमधील प्रवेेशोत्सवाबाबत आयोजित विविध विभागांच्या जिल्हा व तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीच्या अध्यक्षतेवरून राहुल शिंदे बोलत होते. शाळा आणि अंगणवाड्यांच्या अंतर्गत तसेच बाह्य परिसराच्या स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे. अन्नधान्य साठवणुकीची खोली स्वच्छ ठेवून धान्याच्या दर्जाची तपासणी करावी. तसेच पिण्याचे पाणी, वीज यांसह इतर पायाभूत सुविधा पुरवाव्यात, अशी सूचना त्यांनी केली.
सर्व ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका क्षेत्रातील शाळा व अंगणवाड्यांच्या इमारतींच्या स्थितीची पाहणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच करावी. आवश्यकता भासल्यास विद्यार्थ्यांचे दुसऱ्या इमारतीत स्थलांतर करावे आणि मुलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश राहुल शिंदे यांनी दिले. शाळा व अंगणवाड्यांना पुरवल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची ‘एफटीके किट’द्वारे तपासणी करूनच पुरवठा करावा. शाळांच्या आजूबाजूला असलेल्या धोकादायक विजेच्या तारा आणि विजेचे खांब इतरत्र हलवावेत, असेही त्यांनी सांगितले.
१ जून रोजी शाळांचा प्रवेशोत्सव सर्व शाळांमध्ये उत्साहात साजरा करण्यात यावा. एकही मूल शाळेबाहेर राहणार नाही याची दक्षता घ्यावी. शाळाबाह्य मुलांच्या पालकांचे प्रबोधन करून मुलांना शाळेत आणण्याचे काम करावे. अंगणवाड्यांमध्ये महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आणि शाळांमध्ये महिन्याच्या चौथ्या शनिवारी पालकांची बैठक घेणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सर्व शासकीय वसतिगृहांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्यासोबतच मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे. आवश्यक सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही संध्याकालच्या वेळी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग आयोजित करावेत, असे निर्देश राहुल शिंदे यांनी दिले.
सर्व शाळा, अंगणवाड्या आणि शासकीय कार्यालयांमध्ये वृक्षारोपण करून वनमहोत्सव कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा करावा. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करावी, अशी सूचना त्यांनी केली.
या बैठकीला जिल्हा पंचायत प्रकल्प संचालक रवी बंगारप्पनवर, उपसचिव (विकास) बसवराज अडवीमठ, नगरविकास कक्षाचे प्रकल्प संचालक मल्लिकार्जुन कलादगी यांच्यासह विविध विभागांचे जिल्हा व तालुका पातळीवरील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.




