बेळगाव लाईव्ह : नवी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या हायकमंड स्तरावर कर्नाटकच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री झाल्यास बेळगाव जिल्हा पालक मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे केपीसीसी (KPCC) अध्यक्षपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या नेत्याला मुख्यमंत्री पद मिळण्याचा इतिहास असल्याने या पदासाठी रस्सीखेच सुरू आहे.
सरकार स्थापनेच्या वेळी डी. के. शिवकुमार लोकसभा निवडणुकीपर्यंत प्रदेशाध्यक्ष पदावर राहतील, असे हायकमंडने स्पष्ट केले होते. त्यानंतर सिद्धरामय्या गटाकडून त्यांना या पदावरून हटवण्याचे प्रयत्न झाले, परंतु सत्ता हस्तांतराचा वाद मिटेपर्यंत पद सोडणार नाही, अशी भूमिका डी. के. शिवकुमार यांनी घेतली आहे. दुसरीकडे, सतीश जारकीहोळी यांनी प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यास मंत्रिपद सोडण्याची तयारी दर्शवली असून, २०२८ मध्ये मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
राज्यात लिंगायत, मुस्लिम, दलित आणि मागास प्रवर्गाला प्रतिनिधित्व देण्यासाठी तीन ते चार उपमुख्यमंत्री पदे निर्माण होण्याची शक्यता आहे. सिद्धरामय्या यांच्या त्यागाची दखल घेत त्यांचे सुपुत्र आणि विधान परिषद सदस्य यतींद्र सिद्धरामय्या यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्वासन हायकमंडने दिले असल्याचे सूत्रांकडून समजते.

राज्यसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झाली आहेत. एआयसीसी (AICC) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची पुनर्निवड निश्चित मानली जात असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावाचीही चर्चा आहे. यासोबतच विधान परिषद सदस्य बी. के. हरिप्रसाद आणि खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे नाव आघाडीवर असून, तिसऱ्या जागेसाठी इतर राज्यातील नेत्याला संधी देण्याचा विचार हायकमंड करत आहे.




