बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केंद्र सरकारच्या महिला आरक्षण धोरणावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस नगरसेवकांमध्ये प्रचंड राडा झाला. राजकीय श्रेयावरून दोन्ही बाजूचे लोकप्रतिनिधी आमनेसामने आल्याने सभागृहाचे वातावरण कमालीचे तापले होते.
सभेच्या सुरुवातीलाच नामनिर्देशित नगरसेवक दिनेश नाशिपुडी यांनी महिला आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला. “देशात महिला आरक्षणाची पायाभरणी काँग्रेसनेच केली असून भाजपने पूर्वी याला विरोध दर्शवला होता,” असा दावा त्यांनी केला. तसेच केवळ निवडणुकीच्या राजकारणासाठी मतदारसंघ पुनर्रचनेचे कारण पुढे केले जात असल्याची टीका नाशिपुडी यांनी केली.
या टीकेमुळे सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संतप्त झाले आणि त्यांनी नाशिपुडी यांच्यासमोर घोषणाबाजी सुरू केली. “काँग्रेसची संस्कृतीच महिलाविरोधी आहे,” असा पलटवार करत भाजप सदस्यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याने सभागृहात गोंधळ शिगेला पोहोचला.
महापौर प्रीती कामतकर यांनी वारंवार नगरसेवकांना शांत राहण्याचे आवाहन केले, मात्र सदस्यांचा आरडाओरडा थांबत नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर सभागृहातील गोंधळ आणि तणाव निवळण्यासाठी महापौरांनी महापालिकेचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला.





