बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या अल्पसंख्याक खात्याकडून बेकायदेशीररित्या बुडाच्या मालकीची जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न स्थानिक जागरूक रहिवाशांनी हाणून पाडल्याची घटना आज मंगळवारी सकाळी रामतीर्थनगर येथे घडली.
रामतीर्थनगर येथे अल्पसंख्यांक खात्याचे मुलांचे वसतिगृह आहे. या वस्तीगृहासमोर बेळगाव शहर विकास प्राधिकरणाची (बुडा) जमीन आहे. तथापि सदर स्वतःचीच असल्याप्रमाणे अल्पसंख्यांक खात्याकडून या जमिनी सभोवती आवार भिंत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. या पद्धतीने सार्वजनिक जमीन हडपण्याचा हा प्रकार लक्षात येताच त्याची कल्पना रामतीर्थनगर येथील जागरूक नागरिकांनी यापूर्वी वेळोवेळी प्रशासनाला दिली होती.
संबंधित अधिकाऱ्यांसह स्थानिक नगरसेवकांना देखील याबद्दल सजग करून तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली होती. तथापि आजपर्यंत कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे संतप्त झालेल्या रामतीर्थनगर येथील नागरिकांनी आज मंगळवारी सकाळी अल्पसंख्यांक खात्याच्या मुलांच्या वस्तीगृहासमोरील आवार भिंत बांधण्यात येत असलेल्या जमिनीच्या ठिकाणी धरणे आंदोलन छेडले. तसेच जोपर्यंत बांधलेली आवार भिंत पाडून संबंधित जमीन सुरक्षित केली जात नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहील असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला.

या पद्धतीने रामतीर्थनगरवासीयांनी आक्रमक पवित्रा घेताच खडबडून जाग्या झालेल्या महापालिका आणि अल्पसंख्यांक खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि उपमहापौर हनुमंत कोंगाली हे देखील घटनास्थळी दाखल झाले. यावेळी उपमहापौर कोंगली यांच्यासह अधिकारीवर्गाने चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे सांगून आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
तथापि संतप्त आंदोलनकर्त्यांनी जोपर्यंत बांधलेली आवार भिंत पाडली जात नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही, या आपल्या निर्धाराचा पुनरुच्चार केला. अखेर उपस्थित अधिकारीवर्गाने नमते तात्काळ बांधलेली भिंत पाडली जाईल असे सांगताच रामतीर्थनगर येथील नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने संबंधित जमिनी सभावतीची भिंत पाडण्याचे काम हाती घेण्यात आले.




