बेळगाव लाईव्ह : गेल्या अनेक वर्षांपासून बळ्ळारीनाल्यात साठलेला गाळ आणि जलपर्णी काढण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी प्रत्येक मार्गाचा अवलंब केला. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासनांशिवाय कोणतीच ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे यावर्षीही शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी पिकांपासून वंचित राहावे लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे नाला परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
पूर्वी अनगोळ, चन्नमानगर, टिळकवाडी, वडगाव या भागातील सांडपाणी ड्रेनेज वाहिनीद्वारे दूर सोडले जायचे. परंतु, आता तेच सांडपाणी आणि येळ्ळूर रस्ता केएलई परिसरातील पाणी थेट येळ्ळूर रस्ता पुलाजवळ नाल्यात सोडले जात आहे. यामुळे पूर्वी बारा महिने स्वच्छ पाण्याने वाहणारा बळ्ळारीनाला आता ‘गटर गंगा’ बनला असून, परिसरातील शेतकरी आणि जनतेच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे मनपा ‘स्वच्छ बेळगाव, सुंदर बेळगाव’साठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, दुसरीकडे नाला परिसरातील नागरिकांना मात्र नरकयातना भोगाव्या लागत आहेत.
यावर्षी जर बळ्ळारीनाल्यातील गाळ आणि जलपर्णी काढली नाही, तर राजहंसगड, येळ्ळूर, सुळगा, धामणे, मजगाव आणि शहापूर शिवारातून येणारे पावसाचे पाणी आडून शेकडो एकर शेती नष्ट होण्याचा धोका आहे. मनपा हद्दीतील सांडपाणी या नाल्यात मिसळत असल्याने याची साफसफाई करण्याची जबाबदारी मनपाचीच आहे. मात्र, “हा नाला आमच्या हद्दीत येत नाही” असे सांगून मनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) हात झटकत आहेत. “हा नाला जर या दोघांच्या हद्दीत येत नसेल, तर तो काय पाकिस्तानात येतो का?” असा संतप्त सवाल स्थानिक शेतकरी विचारत आहेत.
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी करताना येथील दुर्गंधी पाहून तीव्र खेद व्यक्त केला होता. त्यामुळे आतातरी मनपाने आपली जबाबदारी ओळखून बळ्ळारीनाल्याची तातडीने स्वच्छता करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे; अन्यथा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे सिद्ध होईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.





