बेळगाव लाईव्ह : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने घेतलेल्या एसएसएलसी म्हणजेच इयत्ता दहावी परीक्षेचा पुनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये बेळगावच्या दिव्या प्रदीप देसाई हिने ६२५ पैकी ६२५ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावण्याचा अभूतपूर्व पराक्रम केला आहे.
मुख्य निकाल जाहीर झाल्यानंतर गुणांमध्ये काही त्रुटी राहिल्याचा संशय असल्याने दिव्याने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. फेरतपासणीत तिच्या उत्तरपत्रिकेतील गुण अचूक ठरल्याने तिला सर्व विषयांत पूर्ण गुण मिळाले आणि ती राज्यात पहिली आली आहे.
दिव्याने सर्व विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही मूल्यमापनात तिने शंभर टक्के गुण प्राप्त केले असून तिला एकूण ६२५ गुण मिळाले आहेत. याशिवाय शारीरिक आणि आरोग्य शिक्षण, वृत्ती आणि मूल्ये, कार्य अनुभव तसेच कला शिक्षण या सर्व सह-शालेय उपक्रमांच्या अंतर्गत मूल्यमापनातही दिव्याने सर्वोच्च ग्रेड मिळवून आपले अव्वल स्थान राखले आहे.
दिव्या च्या या घवघवीत यशाने बेळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवा इतिहास रचला गेला आहे. दहावीच्या परीक्षेत ६२५ पैकी ६२५ गुण मिळवणे ही अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक कामगिरी मानली जाते. दिव्यासोबतच बेळगावच्या संजोता हिनेही पुनर्मूल्यांकनानंतर ६२२ गुण मिळवून राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. ९९.५२ टक्के गुणांसह तिने मिळवलेले हे यश देखील अत्यंत कौतुकास्पद आहे.





