बेळगाव लाईव्ह :पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच-48) बेळगावपासून सुमारे 18 कि.मी. अंतरावर असलेल्या बागेवाडी घाटातील बडेकोळ्ळमठ वळण हे गंभीर अभियांत्रिकी त्रुटींमुळे विशेषतः पावसाळ्यात एक प्रमुख अपघातप्रवण भाग म्हणून ओळखले गेले आहे. यासंदर्भात पोलिसांनी व्यक्त केलेल्या चिंतेची दखल घेत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) संबंधित त्रुटी दूर करण्यासाठी 3 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.
बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी अनेक महिन्यांपासून एनएचएआयकडे बडेकोळ्ळमठ वळणाच्या समस्येचा सातत्याने पाठपुरावा करत वळणाच्या सदोष रचनेमुळे निर्माण होणारा धोका अधोरेखित केला होता. सदर वळणाच्या ठिकाणी 18 हून अधिक प्राणघातक अपघातांची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक मूल्यांकन करण्यासाठी केएलएस गोगेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (जीआयटी) बेळगाव येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील तज्ञांना पाचारण केले आहे.
प्राध्यापक अर्चना शगोटी, सोमनाथ खोड आणि कार्तिक कुलकर्णी यांचा समावेश असलेल्या तज्ज्ञांच्या पथकाने जुलै 2025 मध्ये केलेल्या तपासणीत रस्त्याच्या भूमितीमध्ये, विशेषतः उताराच्या वळणावर, गंभीर त्रुटी आढळून आल्या.
सर्वेक्षणानुसार, ताशी 80 कि.मी. वेगमर्यादा असलेल्या क्षेत्रांसाठी इंडियन रोड काँग्रेसच्या (आयआरसी) 230 मीटरच्या मानकापेक्षा या वळणाची त्रिज्या कमी आहे. तसेच, वळणावर रस्त्याचा पृष्ठभाग धोकादायकपणे 11 मीटरवरून 10 मीटरपर्यंत आणि पुढे एका भुयारी मार्गाजवळ 9.5 मीटरपर्यंत अरुंद होत असल्याचे आढळले, जो अपघाताचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखला जातो.
तज्ज्ञांच्या अभ्यासात असेही नमूद केले आहे की, चढ-उताराच्या भूभागावर अतिवेग आणि मार्ग (लेन) शिस्तीचा अभाव ही त्या ठिकाणी होणाऱ्या अपघातांची प्रमुख कारणे आहेत. पोलीस आयुक्त बोरासे यांनी तीव्र उतार आणि तीव्र वळणामुळे विशेषतः पावसाळ्यात बडेकोळ्ळमठ वळणाच्या ठिकाणी वाहनावर नियंत्रण ठेवणे कठीण होते.
चालकांसाठी हा एक आव्हानात्मक रस्ता असल्याचे सांगितले तसेच या वळणाच्या त्रुटी आता अधिकृतपणे ओळखल्या गेल्या असून एनएचएआयने त्या दुरुस्त करण्याचे वचन दिले आहे,” असे सांगितले. जीआयटी प्राध्यापकांच्या पथकाने पुढील अपघात टाळण्यासाठी वळणाची पुनर्रचना करणे, रस्त्याची भूमिती सुधारणे आणि वेगमर्यादेची अंमलबजावणी करणे यासह अनेक सुधारणात्मक उपाययोजनांची शिफारस केली आहे.





