belgaum

राकसकोप जलाशयात दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा

0
232
dc roshan
 belgaum

बेळगाव लाईव्ह : उन्हाळ्याची तीव्रता वाढत असली तरी बेळगाव शहर आणि जिल्ह्यात सध्या पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली आहे. आगामी काळातील पाणीटंचाईच्या शक्यता गृहीत धरून प्रशासनाने आतापासूनच कृती आराखडा तयार केला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना जलसाठ्याची सद्यस्थिती मांडली. ते म्हणाले की, बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयात पुढील दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तूर्तास कोणतीही आवश्यकता नाही. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषद आणि महापालिका प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नद्यांमधील पाणी पातळीवर भाष्य करताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, हिप्परगी धरणात २ टीएमसी पाणी शिल्लक असून ते पिण्यासाठी प्राधान्याने वापरले जाईल. कृष्णा नदीतील प्रवाहासाठी महाराष्ट्रातील कोयना जलाशयातून २ टीएमसी पाणी राजापूर बंधाऱ्यामार्फत सोडण्याबाबत विनंती केली जाणार आहे. मुख्यमंत्री आणि जिल्हा पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती मोहम्मद रोशन यांनी दिली.

 belgaum

सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना घटप्रभा आणि मलप्रभा नद्यांचाही आढावा घेण्यात आला आहे. घटप्रभा कालव्यांच्या दुरुस्तीचे काम १० दिवसांत पूर्ण करून त्यात पाणी सोडले जाईल. तसेच मलप्रभा नदीतून धारवाड आणि रोण भागासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. पाणीटंचाई भासल्यास खासगी कूपनलिकांचे अधिग्रहण करण्याची तयारीही प्रशासनाने ठेवली असल्याचे मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

वाढत्या उष्म्याबाबत चिंता व्यक्त करताना जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. “जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून नागरिकांनी दुपारच्या वेळी शक्यतो प्रवास टाळावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवण्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी,” असे मोहम्मद रोशन यांनी नमूद केले. शहरात आणि ग्रामीण भागात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.