बेळगाव लाईव्ह : शिवछत्रपतींच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या होसूर येथील मराठा युवक मंडळाच्या शिवज्योत यात्रेमध्ये ८५ वर्षांच्या आजींनी दाखवलेला उत्साह सध्या सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. मालवणच्या सर्जेकोट किल्ल्यावरून आणलेली ही शिवज्योत घेऊन आजींनी चक्क एक किलोमीटर धावत आपली निष्ठा व्यक्त केली.
मालवण येथील ऐतिहासिक सर्जेकोट किल्ल्यावरून मराठा युवक मंडळ होसूरच्या कार्यकर्त्यांनी शिवज्योत प्रज्वलित केली होती. ही ज्योत घेऊन कार्यकर्ते जेव्हा चंदगड परिसरात पोहोचले, तेव्हा शिवभक्तांनी मोठ्या उत्साहात तिचे स्वागत केले. शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
या प्रवासादरम्यान शिवज्योत चंदगडमध्ये दाखल झाली असता, एका ८५ वर्षीय आजींनी ही ज्योत आपल्या हाती घेतली. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर जिथे हालचाली मंदावतात, तिथे या माऊलीने हातात शिवजोत धरून तब्बल एक किलोमीटरचे अंतर धावत पार केले. आजींच्या या चपळाईने आणि ऊर्जेने उपस्थित तरुण कार्यकर्तेही भारावून गेले होते.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजा नसून आमच्यासाठी दैवत आहेत आणि त्यांच्याबद्दलची हीच खरी श्रद्धा असल्याचे समाधान या आजींनी व्यक्त केले.
केवळ तरुण पिढीच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकही शिवविचारांनी कसे प्रेरित आहेत, याचे दर्शन या निमित्ताने घडले.





