belgaum

‘गोड’ यात्रेचा आदर्श मराठा समाजाने घेत प्रगती साधावी

0
556
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जवळ असलेल्या मलतवाडी गावामध्ये नुकतीच लक्ष्मीची यात्रा अत्यंत उत्साहात आणि आदर्श पद्धतीने साजरी करण्यात आली.

या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे उत्सवात दारू पिणाऱ्याला ५ हजार रुपये आणि प्राण्यांचा बळी देणाऱ्याला १० हजार रुपये दंड असा कडक नियम लागू करण्यात आला होता. केवळ दोन दिवसांची ही ‘गोड यात्रा’ यशस्वी करून मलतवाडीने समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. अशा बदलांमुळे मराठा समाजाचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यास मोठी मदत होणार असून, इतर गावांमधील यात्रा संयोजकांनीही यावर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.

मराठा जागृती निर्माण संघाचे गोपाळराव बिरजे यांनी या संदर्भात समाजाला आत्मचिंतनाचे आवाहन केले आहे. बदलत्या विज्ञान युगात मराठा समाजाने आपल्या जत्रा आणि उत्सवांच्या स्वरूपात बदल करणे ही काळाची गरज आहे.

 belgaum

सध्या समाजामध्ये अनेक आर्थिक समस्या निर्माण झाल्या असून भूमिपुत्र शेतकरी भूमिहीन होत चालला आहे. नोकऱ्या आणि व्यापारावर परप्रांतीयांचे वर्चस्व वाढत असून विद्यार्थ्यांची शैक्षणिक परिस्थिती कठीण होत आहे. अशा परिस्थितीत भक्तीपेक्षा मद्यपान आणि मांसाहाराला प्राधान्य देणाऱ्या जत्रांमुळे समाजाचे नुकसान होत असल्याची भीती बिरजे यांनी व्यक्त केली आहे.

जर आपण पेहराव, शेतीची पद्धत आणि वाहतुकीची साधने विज्ञानानुसार बदलली आहेत, तर उत्सवातील अनिष्ट प्रथा का बदलू शकत नाही? आजच्या २१ व्या शतकात विज्ञानाची कास धरून मुलांचे शिक्षण आणि भवितव्य सुरक्षित करणे महत्त्वाचे आहे.

केवळ परंपरा म्हणून आठ-नऊ दिवस जत्रा चालवणे, कामाचे दिवस वाया घालवणे आणि आहेर-माहेरच्या नावाखाली खर्च करणे आता थांबवायला हवे. याऐवजी मोबाईलद्वारे निमंत्रण देणे, जत्रेचा कालावधी कमी करणे आणि बळी प्रथा बंद करून सात्विक पद्धतीने उत्सव साजरा करणे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गरजेचे आहे, असे विचार गोपाळराव बिरजे यांनी मांडले आहेत.

मलतवाडीच्या या आदर्श उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, मराठा समाजाच्या हितासाठी इतर गावांनी देखील उत्सवाच्या स्वरूपात असेच विधायक बदल स्वीकारावेत, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे. अशा क्रांतीकारी पावलांमुळेच समाजाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल हे निश्चित आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.