बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात तीव्र उष्णतेची लाट पसरली असून उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये तापमान अतिउष्णतेच्या पातळीवर पोहोचले आहे. परिणामी सकाळपासूनच परिस्थिती गंभीर झाली आहे.
कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती निरीक्षण केंद्राने (केएसएनडीएमसी) दिलेल्या आकडेवारीनुसार, कलबुर्गी जिल्ह्यात 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, जे गेल्या कांही दिवसांतील राज्यातील सर्वाधिक तापमान आहे.
यामुळे कलबुर्गी जिल्हा सध्याच्या उष्णतेच्या केंद्रस्थानी आला असून अनेक ठिकाणी तापमान 42 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असल्यामुळे संपूर्ण प्रदेशात तीव्र परिस्थिती निर्माण झाली आहे.
बेळगाव जिल्हा देखील राज्यातील सर्वाधिक उष्णताग्रस्त भागांपैकी एक म्हणून समोर आला आहे. स्थानिक माहितीनुसार कागवाड तालुक्यातील शेडबाळ गावात तापमान 44.9 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.
यामुळे बेळगावची गणना कर्नाटकातील सर्वाधिक उष्ण जिल्ह्यांमध्ये होत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार बेळगाव जिल्ह्यात केवळ निवडक निरीक्षण स्थळांवरच तापमान 42 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडत असल्याचे दिसत असले तरी, एकूण अहवाल उत्तर कर्नाटकात तापमानात मोठी वाढ झाल्याची पुष्टी करतो.

विशेषतः उत्तर कर्नाटकाच्या अंतर्गत भागात उष्णतेची लाट तीव्र असून कलबुर्गी, रायचूर, बिदर आणि विजयपुरा यांसारख्या जिल्ह्यांमध्ये सातत्याने उच्च तापमान अनुभवले जात आहे. अधिकाऱ्यांनी प्रभावित भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा आधीच जारी केला असून, येत्या काही दिवसांत ‘उष्ण दिवस’ ते ‘उष्णतेची लाट’ अशी परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा दिला आहे. या तीव्र उष्णतेचा परिणाम दैनंदिन जीवनावर, विशेषतः बाहेर काम करणाऱ्या कामगारांवर आणि प्रवाशांवर होऊ लागला आहे.
तज्ज्ञांनी रहिवाशांना दुपारच्या वेळी थेट उन्हात जाणे टाळण्याचा, तसेच पुरेसे पाणी पिण्याचा आणि उष्माघातापासून बचावासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. हवामान अंदाजानुसार उच्च तापमान कायम राहणार असल्याने, राज्याच्या अनेक भागांमध्ये परिस्थिती गंभीर आहे.





