बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या शनिवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत केंद्र सरकारच्या ‘नारी शक्ती’ कायद्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस नगरसेवकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसविरोधात निषेध ठराव मंजूर केला, तर दुसरीकडे प्रशासनाच्या एकतर्फी कारभाराचा आरोप करत विरोधकांनी सभेवर बहिष्कार टाकला.
सभेच्या सुरुवातीला महापौर प्रीती कामकर यांनी केंद्र सरकारच्या ३३ टक्के महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्याचा मुद्दा उपस्थित केला. हा कायदा महिलांना सक्षम करणारा असताना काँग्रेसने त्याला विरोध करणे म्हणजे नारी शक्तीचा अवमान असल्याचे सांगत महापौरांनी सभागृहात निषेध ठराव मांडला. यावरून सभागृहात दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
काँग्रेसची ही भूमिका महिलांच्या प्रगतीत अडथळा निर्माण करणारी असून जनतेसमोर त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे, अशी टीका महापौर प्रीती कामकर यांनी केली. महिलांना अधिकार देणाऱ्या कायद्याला विरोध करणे ही काँग्रेसची जुनी मानसिकता असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
दुसरीकडे, सत्ताधारी भाजप केवळ राजकारण करण्यासाठी सभेचा वापर करत असून जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला. चर्चेला घाबरून विरोधकांनी सभात्याग केल्याचा दावा उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी केला. नारी शक्ती योजनेला विरोध करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया हनुमंत कोंगाळी यांनी दिली.
सभागृहात आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही आणि लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत आहे, असा आरोप करत विरोधी नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला. महानगरपालिकेच्या आवारात येऊन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात निदर्शने केली. भाजप केवळ एकतर्फी निर्णय घेत असून शहराच्या विकासकामांवर चर्चा करण्याऐवजी राजकीय अजेंडा राबवत असल्याची टीका विरोधकांनी केली. या गोंधळातच सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसविरोधी निषेध ठराव बहुमताने मंजूर केला.


