belgaum

‘त्या’ वृत्तपत्रावर कायदेशीर कारवाईचे महापालिकेचे आदेश

0
138
city corporation, mayor , election
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सीमाभागाचे मुखपत्र असल्याचा दावा करणाऱ्या एका दैनिकाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत ‘अभिवादन’ ऐवजी ‘श्रद्धांजली’ असा शब्द वापरल्याने मोठा वाद निर्माण झाला. या गंभीर चुकीचे पडसाद आज बेळगाव महानगरपालिकेच्या सभेतदेखील उमटले असून संबंधित वृत्तपत्रावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बेळगाव महापालिकेत आज आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत या वादाचे पडसाद उमटले. सदर दैनिकात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील आक्षेपार्ह आणि चुकीच्या मजकुराचा सर्व सदस्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. भाजप नगरसेवकाने या संदर्भात सभागृहात निषेध ठराव मांडला आणि तो एकमताने मंजूर करण्यात आला.

यावेळी बोलताना उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी प्रशासनाला कडक सूचना दिल्या. जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेला मजकूर अत्यंत चुकीचा असून वार्ता विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. यातील कायदेशीर बाबी तपासून संबंधित वृत्तपत्रावर कडक कारवाई करण्यात यावी, असे हनुमंत कोंगाळी यांनी स्पष्ट केले. महापौरांनी देखील या सूचनेला अनुमोदन देऊन कायदेशीर पडताळणीचे आदेश दिले आहेत.

 belgaum

मराठी भाषेत शब्दांना विशेष महत्त्व असते. ‘श्रद्धांजली’ हा शब्द निधनानंतर शोक व्यक्त करण्यासाठी वापरला जातो, तर जयंती हा आनंदाचा सोहळा असतो. अशा मंगलदिनी मृत्यूशी संबंधित शब्द वापरणे ही केवळ भाषिक चूक नसून महामानवाचा अनादर आहे. ‘मुखपत्र’ म्हणवणाऱ्या या दैनिकाच्या बेजबाबदारपणामुळे आंबेडकर प्रेमी संघटनांनी कार्यालयाला घेराव घालून जाब विचारला. व्यवस्थापनाने माफी मागितली असली तरी, वारंवार होणाऱ्या अशा चुकांमुळे सीमाभागात या वृत्तपत्राच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील या दैनिका विरोधात मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.