बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग्जच्या विळख्यातून शहराची सुटका करण्यासाठी महापालिकेने ‘ऑपरेशन बॅनर’ सुरू केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात लागलेल्या बॅनरच्या जंजाळामुळे बेळगावकर त्रस्त झाले होते, मात्र महापालिकेच्या या धडक मोहिमेमुळे आता शहर मोकळा श्वास घेणार आहे.
शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या बॅनरवर महानगरपालिकेने आज कडक कारवाई केली. महापालिकेच्या अभियंत्या लक्ष्मी निप्पाणीकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहरातील राणी चन्नम्मा चौक, डॉ. बी. आर. आंबेडकर रोड, क्लब रोड आणि कोल्हापूर सर्कल यांसारख्या गजबजलेल्या भागांत विनापरवाना लावलेले शेकडो बॅनर हटवले. यामुळे शहराच्या विद्रुपीकरणाला कारणीभूत ठरणारे होर्डिंग्ज आता गायब झाले आहेत.
विशेष म्हणजे, कालच महानगरपालिकेने फूटपाथवरील अतिक्रमणांविरोधात मोठी मोहीम राबवली होती. त्यानंतर लगेचच आज बॅनर आणि होर्डिंग्जवर हातोडा फिरवल्याने अनधिकृत काम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मुदत संपलेले आणि प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता लावलेले हे फलक शहराचे स्वरूप बिघडवत होते, ज्यावर आता महानगरपालिकेने कायमचा तोडगा काढण्याचे ठरवले आहे.

महानगरपालिकेच्या या धाडसी कारवाईचे बेळगावमधील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. बॅनरच्या विळख्यामुळे शहराचे मूळ सौंदर्य हरवले होते, मात्र आता ही मोहीम सातत्याने सुरू ठेवल्यास बेळगाव खऱ्या अर्थाने सुंदर दिसेल, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.




