बेळगाव लाईव्ह : ज्या काळात बहुतांश कुटुंबांमध्ये मुलीचा जन्म अनेकदा निराशाजनक मानला जातो, अशा वेळी सामाजिक कार्यकर्ते संभाजी थोरावत आणि त्यांच्या पत्नी सुमन यांनी सोमवारी बेळगाव जिल्ह्यात त्यांच्या नवजात नातीचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले.
मुलीच्या जन्माचा अभिमानाने उत्सव साजरा करत निपाणी तालुक्यातील बारवाड गावातील थोरावत कुटुंबाने फटाक्यांची आतषबाजी करण्याबरोबरच परिसरात जिलेबीचे वाटप केले. एवढेच नव्हे तर पारंपरिक संगीत, फुलांची उधळण व उत्सव सदृश्य एका उत्साही मिरवणुकीचे आयोजनही केले.
ज्या काळात अनेक कुटुंबांमध्ये मुलीचा जन्म अनेकदा निराशाजनक मानला जातो, अशा वेळी थोरावत कुटुंबाने हा एक वेगळाच मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला. लिंग समानतेला प्रोत्साहन देणारे एक आदर्श उदाहरण म्हणून या अनोख्या सोहळ्याची शेजारीपाजारी आणि गावातील रहिवाशांकडून मोठ्या प्रमाणावर प्रशंसा झाली.
महाराष्ट्रातील सेनापती कापशी येथील रहिवासी वैभवी थोरावत आणि त्यांचे पती विकी सुभाष कांबळे उर्फ चव्हाण यांना कन्यारत्न प्राप्त झाले. सुमन यांनी या बाळाच्या जन्माचे वर्णन एक आशीर्वाद असे केले आहे. त्यांच्या कुटुंबाचा विश्वास आहे की, देवी महालक्ष्मी एका मुलीच्या रूपात त्यांच्या घरात अवतरली आहे.
माध्यमांशी बोलताना संभाजी थोरावत यांनी, “आम्ही समाजाला एक सशक्त संदेश देण्यासाठी हा सोहळा आयोजित केला होता. आम्ही मुलगा आणि मुलगी असा भेद करत नाही.
गेली 26 वर्षे सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार म्हणून काम करताना मी लिंगभेदावर आधारित हे सामाजिक असंतुलन जवळून पाहिले आहे, असे सांगून समाजाने मुलींना मुलांपेक्षा कमी लेखण्याऐवजी त्यांचे खरे मूल्य ओळखणे महत्त्वाचे आहे,” असे संभाजी यांनी स्पष्ट केले.




