बेळगाव लाईव्ह : खानापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारी अतिक्रमणे आज पहाटे नगरपंचायत प्रशासनाने हटवली. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता शिवस्मारक चौक परिसरात ही धडक मोहीम राबवण्यात आली. लोकशाही मार्गाने दिलेल्या लढ्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न मराठी राजभाषा दिनी अखेर मार्गी लागला आहे.
शहराच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमित दुकाने नगरपंचायतीने जेसीबीच्या साहाय्याने हटवली आहेत. या अतिक्रमणामुळे रस्ते रुंदीकरणाचे काम दीर्घकाळापासून रखडले होते. या प्रश्नासाठी पत्रकार दिनकर मरगाळे, विवेक गिरी आणि माजी नगरपंचायत सदस्यांनी आमरण उपोषण केले होते, ज्याला जनतेने आणि सर्व पक्षीय नेत्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला होता. या आंदोलनानंतर प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण आणि मार्किंग पूर्ण करून आज ही कारवाई केली आहे.
गेल्या चार महिन्यांपासून या रस्त्यासाठी आंदोलन सुरू होते. दुकानदार, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक आणि विशेषतः शालेय विद्यार्थी या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त होते. या उपोषणाला सर्वपक्षीयांचा पाठिंबा मिळाला होता, अशी माहिती दिनकर मरगाळे यांनी दिली.
अतिक्रमण काढू नये म्हणून प्रभावशाली व्यक्तींकडून मोठा दबाव आला होता, तरीही अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांसह मोहिमेवर ठाम राहिले. शिवस्मारक चौकातून सुरू झालेल्या या मोहिमेसाठी खानापूर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतली आहे.
सार्वजनिक हितासाठी सुरू असलेल्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून रस्ता रुंदीकरणाचे काम लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




