बेळगाव लाईव्ह :समाजातून स्पर्धात्मक परीक्षातून यश मिळून युपीएससी सारखे अधिकारी बनले पाहिजेत, मराठा समाजातील तरुणाई व्यसन आणि मोबाईलच्या जाळ्यात अडकलेली आहेत त्यांना परत मार्गावर आणण्याची गरज आहे. समाज म्हणून आपलं हे कर्तव्य आहे आणि आपण ते पार पाडले पाहिजे असे मत काडा अध्यक्ष युवराज कदम यांनी व्यक्त केले.
रविवारी दुपारी बेळगाव शहरातील श्री जत्तीमठ देवस्थान येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मैसूर दसरा स्पर्धेत यश मिळवलेल्या कुस्तीपटू त्यांचे कोच आणि स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवलेल्यांचा सत्कार कार्यक्रम समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर कुस्ती स्पर्धेत यश मिळवलेले पैलवान त्यांचे कोच आणि प्रशिक्षणार्थी पीएसआय श्रुती पाटील होत्या.मैसूर दसरा स्पर्धेतील यशस्वी पैलवान प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक श्रुती पाटील यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
मूळच्या कंग्राळी खुर्द येथील रहिवासी असलेल्या एनआईएस कोच आणि सध्या बेळगाव स्पोर्ट्स युथ हॉस्टेलमध्ये प्राशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या स्मिता पाटील यांनी यंदाच्या मैसूर दसरा स्पर्धेत मराठा समाजाच्या सहा मुलींना मेडलची कमाई करून दिली या सत्काराला उत्तर देताना स्मिता पाटील म्हणाल्या “मला एकलव्य पुरस्कार मिळाल्यानंतर महिलांच्या कुस्ती स्पर्धेत बेळगावला यश मिळाले नव्हते परंतु यावर्षी ठरवून बेळगावच्या मुलींनी पदकांची लयलूट केली. अपार परिश्रम करून या मुलीनी यश खेचून आणले आहे पुढील वर्षी यापेक्षा दुप्पट यश संपादन करण्याचा आमचा मानस आहे त्यासाठी नवीन ज्या मुलींना कुस्ती स्पर्धेत सहभागी व्हायचं आहे त्यांनी सरावासाठी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले.
यंदाच्या मैसूर दसरा कुस्ती स्पर्धेत दसरा किशोरी ठरलेली कडोली गावची स्वाती पाटील हिने आपले मनोगत व्यक्त करताना ”परिश्रमा बरोबर आमच्या कोच स्मिता पाटील यांनी आमच्यात जी जिद्द पेरली त्याचे हे फळ आहे पुढील वर्षी आम्ही या खेळात पुढची पायरी गाठण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आमच्या गुरूंची इच्छा पूर्ण करणार आहोत” असे मत मांडले.

53 वर्षानंतर बेळगावला कर्नाटक कंटीरवा केसरीची गदा खेचून आणणाऱ्या पैलवान कामेश याला तयार केलेले त्याचे प्रशिक्षक कंग्राळीचे सुपुत्र NIS कोच प्रशांत पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं की ” पहाटे कंग्राळीच्या रस्त्यावर तुम्हाला आमच्या तालमीचे मल्ल सराव करताना दिसतील त्यांनी गाळलेल्या घामाला हा पुरस्कार म्हणजे आलेली फळं आहेत. आमच्या पैलवानानी दुखापतीवर मात करत यंदा यश खेचून आणलं त्यामुळे या पुरस्काराचा विशेष अभिमान वाटतो”.
कर्नाटक पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थी पीएसआय, कंग्राळी खुर्द गावच्या कन्या श्रुती पाटील यांनी स्पर्धात्मक परीक्षेची भीती न घेता रचनात्मक पद्धतीने अभ्यास केल्यास आपल्याला यश मिळेल आपण शिवरायांचे मावळे आहोत यश संपादन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे.”
ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील यांनी प्रास्ताविक करताना “समाजाने कौतुकाची थाप यशस्वी व्यक्तीच्या पाठीवर मारली तर त्यांना अधिक बळ मिळते समाज म्हणून आपण तरुणाईच्या मागे उभे राहणे गरजेचे आहे. एखाद्या घरात एखादा क्रीडापट्टू, कलाकार किंवा अधिकारी घडत असेल तर त्या पाठीमागे त्या संपूर्ण कुटुंबाचे श्रम असतात त्या कुटुंबाबरोबर समाजानेही योगदान देणे गरजेचे आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने बोलताना वकील अमर येळ्ळूरकर यांनी ” समाजाची उंची मापायची असेल तर त्या समाजातील कर्तुत्वान व्यक्तींचे कार्य तपासले जाते आज या कर्तृत्ववान खेळाडू अधिकाऱ्यांनी समाजाचा स्तर उंचावला आहे. सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी बोलताना ” खेळाडूंचे आणि अधिकाऱ्यांचे प्रशिक्षकांचे कौतुक करताना विशेष आनंद होत आहे कारण समाजातील या लोकांच्या मुळेच नव्या पिढी पुढे आदर्श निर्माण होतोय असा आदर्श निर्माण करण्यासाठी अशा यशस्वी लोकांचे कार्य समाजापुढे आणणे गरजेचे आहे”. उपस्थितांचे स्वागत सकल मराठा समाजाचे शिवराज पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव पाटील यांनी केले शरद पाटील यांनी आभार मानले.
यावेळी मैसूर दसरा स्पर्धेत यश मिळवलेले पैलवान कामेश पाटील(कंग्राळी खुर्द) पैलवान प्रेम जाधव (कंग्राळी खुर्द) पैलवान महेश बिर्जे (तीर्थ कुंडये)
पैलवान पैलवान विनायक पाटील (येळूळर), पैलवान समर्थ डुकरे किणये,पैलवान स्वाती पाटील कडोली, पैलवान प्रांजल तुळजाई (अवचारट्टी), पैलवान भक्ती पाटील (कंग्राळी) पैलवान सानिका हिरोजी कलखांब आणि श्रावणी तरळे(आंबेवाडी) आंबेवाडी अनुश्री चौगुले (अलतगा) प्रशिक्षक स्मिता पाटील प्रशिक्षक प्रशांत पाटील यांच्यासह काडा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल युवराज कदम आणि पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल श्रुती पाटील यांचा सकल मराठा समाजाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
जेष्ठ नागरिक मयूर पाटील यांनी कोच आणी प्रत्येक खेळाडूला 2 हजार रुपयांची प्रोत्साहन धन जाहीर केले.यावेळी सकल मराठा समाजाचे नागेश देसाई, प्रशांत भातकांडे, माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी उपमहापौर रेश्मा पाटील, माजी नगरसेवक राजू बिर्जे, प्रवीण पाटील, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव,सुनील चोळेकर ,आनंद पाटील, सुनील जाधव, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.



