बेळगाव लाईव्ह :”मराठी भाषेला मोठी परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, हेमाद्री पंडित, चक्रधर स्वामी, सावता माळी ,संत तुकाराम,समर्थ रामदास ,छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मोरोपंत ,श्रीधर स्वामी यांच्यासारख्या अनेकांनी दिलेल्या योगदानामुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे”असे विचार बाल शिवाजी वाचनालयाचे संचालक बजरंग धामनेकर यांनी बोलताना व्यक्त केले.
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित “अभिजात मराठी भाषा” सप्ताहात तिसऱ्या दिवशी ” मराठी भाषेचा प्रवास” या विषयावर बोलताना त्यांनी आपले विचार मांडले.
“भाषा टिकविण्यासाठी अनेकांनी मोठा त्याग केला आहे, मराठीची थोरवी गाताना ज्ञानेश्वर माऊली पासून आत्तापर्यंत कोणीच कमी पडले नाही. मराठी भाषा ही सर्व समावेशक आणि सर्व क्षेत्रांना व्यापणारी आहे . मराठी भाषेला उदात्त धोरण आहे त्यामुळेच इतर भाषेतील अनेक शब्दही मराठीने सामावून घेतले आहेत त्यामुळे आपली भाषा प्रगल्भ झाली आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही”. असे सांगून त्यांनी लीळाचरित्र, विवेक सिंधू सारख्या ग्रंथांचे योगदान प्रतिपादन केले.
वारकरी संप्रदायाने त्यानंतर समर्थ रामदासांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याची महती त्यांनी गायली. छत्रपती शिवरायांचे भोसले घराणे हे केवळ धार तलवारीशी संबंधित नव्हते तर या घराण्याने मराठी साहित्याची मोठी सेवा केली आहे. आपल्या भाषेला सोलापूरच्या श्रीधर स्वामीजीं त्यानंतर अनेक शाहीरानी आपल्या पोवाड्याद्वारे होनाजी बाळा सारख्या भूपाळीकारानी, लावणीका रांनी, बखरकारानी आणि वृत्तपत्रांनी ही भाषा वाढवली आहे.

सामाजिक नाटकांचे या भाषेच्या अभिवृद्धीत मोठे योगदान आहे. बेळगावकरांनी विविध क्षेत्रात जी माणसे दिली ती माणसे ही भाषा वृद्धिंगत करून गेली”असे ते म्हणाले.
प्रारंभी कार्यवाह सुनिता मोहिते यांनी प्रास्ताविक केल्यावर अध्यक्ष अनंत लाड यांनी धामणेकर यांचा परिचय करून सन्मान केला. उपाध्यक्ष डॉ विनोद गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी नेताजी जाधव व इतर संचालक तसेच कर्मचारी व निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोमवारचा कार्यक्रम
सोमवारी सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण कॉलेज हलकर्णी चे प्रा संदीप मुंगारे हे मराठी साहित्यावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. याप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे



