belgaum

महसूल वॉर्ड आता निवडणूक वॉर्ड म्हणून ओळखले जाणार

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव महापालिका क्षेत्रातील महसूल वॉर्ड आता यापुढे निवडणूक वॉर्ड म्हणून ओळखले जातील, अशी माहिती महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी दिली आहे. प्रशासकीय कामांमधील गोंधळ टाळण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका कार्यालयात माहिती देताना आयुक्त कार्तिक एम. यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात ५८ वॉर्डांची सीमा निश्चित करण्यात आली आहे.

पूर्वी या वॉर्डांना महसूल वॉर्ड म्हटले जात होते, मात्र महापालिकेचा अभियांत्रिकी विभाग, इतर विभाग आणि नगरसेवक वेगवेगळ्या पद्धतीने हे वॉर्ड ओळखत होते. यामुळे प्रशासनात विनाकारण संभ्रम निर्माण होत होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी आता महसूल वॉर्ड ही संज्ञा रद्द करण्यात आली असून त्याऐवजी निवडणूक वॉर्ड ही संकल्पना पुढे सुरू राहील.

 belgaum

या नव्या निर्णयामुळे महापालिकेचे संपूर्ण प्रशासन आता निवडणूक वॉर्डच्या अखत्यारीत येत आहे. पूर्वी महसूल विभागांतर्गत काम करणारे कर वसुलीदार आणि महसूल निरीक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांची आता निवडणूक वॉर्डनुसार पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक वॉर्डनुसारच आता पीआयडी (Property ID) तयार केले जातील आणि त्यानुसारच नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करावा लागणार आहे. महापालिका प्रशासनाने केलेल्या या बदलाची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.