बेळगाव लाईव्ह :पंचायत व्याप्तींमध्ये काम करणाऱ्या स्वच्छ वाहिनी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या (सीटू) नेतृत्वाखाली आज सकाळी बेळगाव जिल्हा पंचायतीवर मोर्चा काढून जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या (सीटू) नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी जिल्हा पंचायत कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात जिल्ह्यातील स्वच्छ वाहिनी महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. हातात कामगार संघटनेचे चिन्ह असलेला लाल बावटा हातात धरून न्यायाची मागणी करत आणि इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत निघालेल्या या मोर्चाने साऱ्यांचे लक्ष वेधूले होते.
जिल्हा पंचायत कार्यालयाच्या ठिकाणी मोर्चाची सांगता होऊन मोर्चेकरी महिलांनी प्रवेशद्वारासमोर जमिनीवर ठिय्या मारून निदर्शने करत धरणे सत्याग्रह सुरू केला. याची माहिती मिळताच जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) सहाय्यकांनी आंदोलनकर्त्या स्वच्छ वाहिनी महिला कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतली. तसेच त्यांनी सादर केलेल्या निवेदनाचा स्वीकार करून ते सरकार दरबारी पाठवण्याद्वारे लवकरात लवकर मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या (सीटू) नेत्यांनी सांगितले की, तालुका पंचायत कार्यक्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वच्छ वाहिनी कर्मचाऱ्यांची स्वच्छ भारत अभियान आणि स्व -सहाय्य संघांच्या अंतर्गत नेमणूक करण्यात आली आहे.

या कर्मचाऱ्यांपैकी काहींना वाहन चालकाचे पद देण्यात आले असून महिलांवर सार्वजनिक स्वच्छतेचे काम सोपवण्यात आले आहे. महिलांचे सबलीकरण करण्याचा सरकारची ही कृती अभिमानास्पद असली तरी दुसरीकडे कामाच्या मोबदल्यात त्या महिलांना योग्य वेतन मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर भिक्षुकीकरण करण्याची वेळ आली आहे. वेतन देण्याऐवजी त्यांना लोकांकडून दहावीस रुपये गोळा करण्याद्वारे तुमचा पगार वसूल करा असे सांगितले जात आहे.
याचा आम्ही तीव्र निषेध करतो. त्याचप्रमाणे या स्वच्छ वाहिनी महिला कर्मचाऱ्यांना जिल्ह्यात समान वेतन मिळत नाही. कुठे दोन हजार, कुठे अडीच हजार, कुठे तीन हजार रुपये असा पगार त्यांना दिला जातो. हे देखील निषेधार्ह आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्यांना हावेरी जिल्ह्यात ज्याप्रमाणे वाहन चालकास 7500 रुपये आणि सहाय्यकाला 5000 रुपये असे जे सर्वत्र समान वेतन दिले जाते तसे वेतन दिले जावे असा आदेश बेळगाव जिल्हा पंचायत सीईओंनी जिल्ह्यातील सर्व तालुका पंचायतींच्या नावे काढावा, अशी आमची मागणी असल्याचे सांगून सीटू नेत्यांनी स्वच्छ वाहिनी कर्मचाऱ्यांच्या अन्य विविध समस्या प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडल्या.