बेळगाव लाईव्ह :सध्या बेळगावचे तापमान 37 अंशावर असल्यामुळे नागरिक उष्म्याने हैराण झालेले असतानाच आज सोमवारी ढगाळ वातावरण निर्माण होण्याबरोबरच उष्णतेत वाढ झाल्याने पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 13 मे पासून मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर ढगाळ वातावरण निर्माण होण्याच्या स्वरूपात बेळगावातही मान्सूनचे संकेत मिळू लागले आहेत. हवामान खात्याच्या होऱ्यानुसार साधारणतः 27 मे पासून मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
त्याचे परिणामही आता दिसून येत असून बेळगाव शहर परिसरात ढगाळ वातावरणासह कांही अंशी पाऊस पडला आहे. तथापी तुरळक पावसामुळे अजूनही उष्म्यात घट न झाल्याने हा पाऊस आणखी संध्याकाळपर्यंत पडण्याची शक्यता दिसून येत आहे.
बेळगाव शहर परिसरात सध्या नागरिक उष्म्याने हैराण झाले आहे तर काही ठिकाणी पाण्याची समस्या ही निर्माण झाली आहे. राकसकोप जलाशयात समाधानकारक पाणीसाठा असला तरी उष्म्यामुळे तो खालावत असल्याची माहिती पाटबंधारे खात्याने दिली आहे.
त्यामुळे याचा फटका खंडित पाणीपुरवठाच्या स्वरूपात शहरवासीयांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या बेळगाव शहर परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उष्णता मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाऊस पडल्यानंतर हा उष्मा कमी होणार की वाढणार हे येत्या काळात समजणार आहे.