बेळगाव लाईव्ह:गल्लोगल्ली उभारलेले स्प्रिंकलर्स त्यातून फवारले जाणारे पाणी आणि डीजेच्या तालावर बेभान थिरकणारी तरुणाई अशा जल्लोषपूर्ण वातावरणात शहर परिसरात आज शुक्रवारी रंगपंचमी अर्थात धुळवड विविध रंगांची उधळण करत शांततेत साजरी झाली. शहरवासीयांनी एकमेकांना रंग लावून होळी -रंगपंचमीच्या शुभेच्छा देत अपूर्व उत्साहात सणाचा आनंद लुटला.
शहर परिसरात काल गुरुवारपासूनच रंगपंचमीची तयारी सुरू होती. बाजारपेठेत विविध रंग, पिचकारी, वेगवेगळे मुखवटे, रंगीबेरंगी केसांचे टोप दाखल झाल्याने त्यांची खरेदी काल तेजीत होती. काल रात्री होळी पेटली आणि रंगोत्सवाला प्रारंभ झाला.
रात्री सर्वत्र टिमक्या वाजवत हौशी तरुणाईने रंगपंचमीला सुरुवात केली. परंतु आज शुक्रवारी या रंगोत्सवाला खऱ्या अर्थाने उधाण आले होते. नेहमीप्रमाणे रंगपंचमी साजरी करताना युवा पिढीचा उत्साह ओसंडून वाहत होता. युवतींचा पोशाख परिधान केलेले आणि विविध रंगांच्या केसाचे टोप व मुखवटे धारण केलेले युवक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. त्याचप्रमाणे गल्लोगल्ली बाल चमू एकमेकांना पिचकारीतील रंगाने भिजवत रंगोत्सवात तल्लीन झालेला पहावयास मिळत होता.
शहरातील टेंगिनकेरा, गल्ली चव्हाट गल्ली कामत गल्ली विविध गल्ल्यासह चन्नम्मानगर, टिळकवाडी, अनगोळ वगैरे उपनगरांमध्ये रंगपंचमीच्या निमित्ताने रस्ते, उद्याने आदी ठिकाणी पाण्याची फवारणी करणारेच स्प्रिंकलर्स उभारण्यात आले होते. डीजेच्या तालावर त्या ठिकाणी तरुणाई बेभान रेन डान्स करत रंगोत्सवाचा आनंद लुटला.
शहरातील सध्याच्या वाढत्या उष्म्यामध्ये पाण्याची फवारणी करणाऱ्या स्प्रिंकलर्सनी संबंधित परिसरात गारवा पसरवला होता. टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर दरवर्षीप्रमाणे ‘होली मिलन’ हा सामूहिक रंगोत्सवाचा कार्यक्रम तरुणाईच्या भरघोस प्रतिसादासह जल्लोषात पार पडला.
विशेष म्हणजे दिलखुलास वृत्तीचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. भीमाशंकर गुळेद यांनी देखील संगीताच्या तालावर थिरकत सपत्नीक रंग खेळून रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला. या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रमाणेच इतर बऱ्याच प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांनी शहरवासीयांसमवेत आजच्या रंगोत्सवात सहभाग दर्शवला होता.
कांही ठिकाणी उत्साही तरुणांनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना त्यांच्या परवानगीने जुजबी रंग लावून शुभेच्छा देत त्यांनाही सणाच्या आनंदात सहभागी करून घेतले होते. परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे रंगपंचमी निमित्त आज शहरातील पांगुळ गल्ली येथील जागृत देवस्थान श्री अश्वत्थामा मंदिर येथे लोटांगण घालण्याचा कार्यक्रम देखील भक्तीभावाने पार पडला. ज्यामध्ये शेकडो भाविकांनी सहभाग दर्शवला होता. होळीसह रंगपंचमी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर आणि उपनगरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.