Tuesday, March 18, 2025

/

स्मशनभूमीची जागा द्या अन्यथा…. ग्रामस्थांचा इशारा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील देवगिरी (कडोली) येथील स्मशानभूमीच्या जागेवर त्रयस्थांकडून मालकी हक्क सांगण्यात येत असल्याच्या निषेधार्थ तसेच संबंधित जागा स्मशानभूमीसाठीच राखीव ठेवावी या मागणीसाठी देवगिरी येथील संतप्त गावकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन सादर केले. यावेळी स्मशानभूमी जागेवर मालकी हक्क सांगणाऱ्यांच्या प्रतिकृतीचे दहनीही करण्यात आले.

देवगिरी (कडोली) येथील स्मशानभूमीची जागा अबाधित ठेवावी या मागणीसाठी आज शुक्रवारी सकाळी देवगिरी वासियांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून चन्नम्मा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. ‘आमचे स्मशान आमचा हक्क’ अशा घोषणांचे फलक हातात घेऊन जोरदार निदर्शने करत देवगिरी गावकऱ्यांनी काढलेला हा मोर्चा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.

मोर्चा चन्नम्मा सर्कल येथे आला असता त्या ठिकाणी स्मशानभूमीची जागा बळकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या प्रतिकृतीचे दहन करून संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर मोर्चेकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन देवगिरी येथील गावच्या स्मशानभूमीच्या जागेची समस्या तात्काळ निकालात काढून ती जागा स्मशानभूमीसाठीच राखीव ठेवावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून मागणीचा सहानभूतीपूर्वक विचार करण्याद्वारे योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. देवगिरी ग्रामस्थांनी काढलेल्या आजच्या मोर्चात गावकऱ्यांसह गावातील महिलांची संख्या देखील लक्षणीय होती.Devgiri

आपल्या मागणी संदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना देवगिरी येथील देवस्थानाचे बसवराज कबीरदास माने यांनी सांगितले की, आम्हा देवगिरी येथील गावकऱ्यांसाठी अद्यापपर्यंत स्मशानभूमीची सोय झालेली नाही. तथापि गावकरी आजपर्यंत गावानाजीकच्या एका ठराविक जागेत मयतांचे अंत्यसंस्कार करत आहेत. गावच्या स्मशानाच्या या जागेवर अलीकडे कांही लोकांनी आपला कब्जा सांगण्यास सुरुवात केली आहे.

परिणामी गावकरी आणि संबंधित लोकांमध्ये निर्माण झालेला स्मशानभूमीचा वाद सध्या न्यायप्रविष्ठ आहे. गेल्या जवळपास शंभर -दीडशे वर्षांपासून आमच्या वडिलोपार्जित लोकांपासून सदर जागेचा आम्ही स्मशानभूमीसाठी वापर करत आहोत. मात्र आता अचानक त्या जागेवर त्रयस्थ व्यक्तींनी आपला मालकी हक्क सांगण्यास सुरुवात केल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. तथापी गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही सदर जागेचा स्मशानभूमी म्हणून वापर करत आहोत. त्यामुळे ती जागा स्मशानभूमीसाठीच राखीव ठेवली जावी अशी आमची मागणी आहे, अशी माहिती बसवराज माने यांनी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.