बेळगाव लाईव्ह :दरवर्षीप्रमाणे यंदा पावसाळ्यात फोर्ट रोड परिसरात पाणी तुंबून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावने आज भल्या सकाळपासून जिजामाता सर्कल, फोर्ट रोड जवळील नाल्याच्या साफसफाईची मोहीम हाती घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे. तथापि काँक्रीटचा स्लॅब टाकून कायमस्वरूपी बंद करण्यात आलेल्या नाल्याचे चेंबर अरुंद असल्यामुळे स्वच्छता कार्यात अडचण निर्माण होत असून त्यासाठी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने सिमेंट काँक्रीटचा 12 फुटापर्यंतचा छोटा भाग पाडण्यास मदत करावी, अशी विनंती कॅन्टोन्मेंट बोर्डने केली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या क्षेत्रीय पर्यवेक्षक पथकाच्या अहवालानुसार भुईकोट किल्ल्याजवळ फोर्ट रोड येथील नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचला आहे. हा कचरा सीबीटी बस स्टँडच्या बाजूने प्रवाहाच्या दिशेने वाहत असून जिजामाता सर्कलजवळ तो मोठ्या प्रमाणात अडकून पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण करत आहे.
याची दखल घेत या नाल्याची साफसफाई करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने आज मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. यासाठी सफाई कर्मचाऱ्यांचे एक विशेष पथक, एक जेसीबी मशीन आणि गाळ-कचरा गोळा करण्यासाठी एक डंपर तैनात करण्यात आले आहे. तथापी नाला स्वच्छता कामादरम्यान बोर्डाच्या पथकाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे.
नाला अंदाजे 6 फूट खोल असून त्यावर कायमस्वरूपी काँक्रीटचा स्लॅब टाकलेला आहे. उपलब्ध असलेले तोंड अर्थात चेंबर फक्त सुमारे 3 फूट रुंद असल्यामुळे जेसीबी प्रभावीपणे चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. जागेच्या मर्यादेमुळे फक्त एक लहान बादली वापरता येत आहे, ज्यामुळे साफसफाईच्या प्रक्रियेला लक्षणीय विलंब होत असल्याचे कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

त्यांनी हा नाला स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत येत असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ठिकाणी नाल्यावरील सुमारे 12 फूट कायमस्वरूपी काँक्रीटचे आवरण काढून टाकावे. यामुळे मोठ्या जेसीबी उपकरणांचा वापर करणे शक्य होईल आणि साचलेला कचरा काढण्याच्या कामाला गती देण्यास मदत होईल, अशी विनंती केली आहे.
सध्याची परिस्थिती आणि कचऱ्याचे प्रमाण पाहता कॅन्टोन्मेंट स्वच्छता पथकाला अंदाजानुसार साफसफाईचे काम पूर्ण होण्यास 15 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. सीबीटी बस स्टँड सिग्नलजवळील वरच्या भागातून वाहून येणारा बहुतांश कचरा जिजामाता सर्कलजवळ जमा होऊन अडकून पडत असल्यामुळे जर पावसाळ्याच्या ऐन हंगामापूर्वी हा नाला साफ केला नाही, तर जवळच्या व्यावसायिक आणि निवासी भागांमध्ये पाणी साचून पुन्हा पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
ज्यामुळे दरवर्षीप्रमाणे स्थानिक व्यवसाय आणि रहिवाशांवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. आजच्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत आतापर्यंत काढलेल्या कचऱ्यामध्ये प्रामुख्याने रिकाम्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या आणि इतर प्लास्टिक सामग्रीचा समावेश आहे. एकंदर परिस्थिती पाहता मुसळधार पाऊस सुरू होण्यापूर्वी या नाल्याच्या साफसफाईचे काम कॅन्टोन्मेंट बोर्ड स्मार्ट, बेळगाव स्मार्ट सिटी लि. आणि महानगरपालिका यांनी तातडीच्या प्राधान्याने संयुक्तपणे हाती घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जर स्मार्ट सिटी बेळगावने बेळगाव भुईकोट किल्ल्या जवळील कॅन्टोन्मेंट हद्दीतील उपरोक्त नाल्यावरील सिमेंट काँक्रीटच्या वरच्या थराचा 12 फुटांपर्यंतचा छोटा भाग पाडण्यास मदत केली आणि बेळगाव महापालिकेने काढलेला कचरा तात्काळ उचलण्यासाठी अतिरिक्त जेसीबी व डम्पर पुरवून सहकार्य केले, तर आमचे कॅन्टोन्मेंट बोर्डचे स्वच्छता पथक 15 दिवसांच्या आत नाल्यातील कचरा साफ करू शकते, असा विश्वास बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम हरिविजय मंचलवार यांनी व्यक्त केला आहे.




