बेळगाव लाईव्ह :वीरराणी चन्नम्मा हे राज्यप्रेम, देशभक्ती आणि स्वाभिमानाचे दुसरे नांव आहे, असे उत्स्फूर्त उद्गार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काढले.
बेंगलोर येथील कर्नाटक विधान सौध समोरील पायऱ्यांजवळ “कित्तूर विजय ज्योती”चे अनावरण आणि तिच्या यात्रेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. विधान सौध येथून निघालेली कित्तूर विजय ज्योती यात्रा सर्व जिल्ह्यातून प्रवास करत कित्तूरला पोहोचेल. स्वातंत्र्यपूर्व काळात चन्नम्मा या धाडसी महिलेने थेट इंग्रजांना आव्हान दिले. संगोळ्ळी रायण्णा हा देखील राणी चन्नम्मा यांच्या सैन्यात होता.
इंग्रजांना कर देण्याच्या विरोधात लढलेले हे देशभक्त आहेत. राणी चन्नम्मा हे राज्यप्रेम, देशभक्ती आणि स्वाभिमानाचे दुसरे नांव आहे. कित्तूर उत्सव आणि कित्तूरच्या विकासासाठी सरकार सर्व मदत करत असून आवश्यक अनुदानही देत आहे,
आज महात्मा गांधी यांच्या जयंतीसह माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचाही वाढदिवस आहे. गांधींच्या वाटचालीतून त्यांचे तत्त्वज्ञान आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला आहे, असे सांगून गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले आणि शांततेने स्वातंत्र्य मिळवले. 1920 ते 1947 या काळात त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, बेळगाव जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी, पर्यटन खात्याचे मंत्री एच. के. पाटील, महिला व बालविकास खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, मंत्री प्रियांक खर्गे, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील आदी यावेळी उपस्थित होते. कित्तूर उत्सवाचा एक भाग म्हणून राज्यभर काढण्यात येणारी ‘कित्तूर विजय ज्योती’ यात्रा येत्या 23 ऑक्टोबर रोजी चन्नम्माच्या कित्तूर येथे पोहोचेल.