Thursday, October 10, 2024

/

कॉ. कृष्णा मेणसे यांनी सुरू ठेवलेली चळवळ महत्त्वाची -खा. छ. शाहू महाराज

 belgaum

बेळगाव लाईव्ह:स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणाऱ्या कॉम्रेड कृष्णा मेणसे यांनी त्यानंतर गोवा मुक्ती संग्राम असो किंवा बेळगावच्या मराठी माणसासाठी जी चळवळ सुरू ठेवली ती अत्यंत महत्त्वाची आहे. सामाजिक दृष्टिकोनातून बंधुभाव वाढवण्याचा प्रयत्न आजही आवश्यक आहे हे आपल्याला कॉ. मेणसे यांच्या माध्यमातून लक्षात येऊ शकते, असे विचार कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले.

शहरातील क्लब रोडवरील ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील म. गांधी विचार मंचतर्फे गांधी जयंती निमित्त आज बुधवारी सकाळी आयोजित ‘महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार’ वितरण सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सत्कारमूर्ती बेळगावचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, स्वातंत्र्यसेनानी व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते कॉ. कृष्णा मेणसे यांच्यासह दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ पाटील, प्राचार्य जीबी बारदेस्कर, कॉ. संपत देसाई, उद्योजक सुभाष ओऊळकर आदी उपस्थित होते. आपल्या भाषणात खासदार छ. शाहू महाराज म्हणाले गांधी विचार अत्यंत महत्त्वाचा असून आज देखील त्याची जगाला गरज आहे. महात्मा गांधीजींनी अहिंसा विचारसरणीचा वारसा गौतम बुद्ध यांच्याकडून घेऊन तो प्रत्यक्षात अंमलात आणला. दोघांनीही वेगवेगळ्या तऱ्हेने त्या काळात एकाने 2600 वर्षांपूर्वी आणि दुसऱ्याने 100 वर्षांपूर्वी अंमलात आणला.

दोघांमध्ये तब्बल अडीच हजार वर्षाचा अंतर जरी असलं तरी अडीच वर्षांपूर्वीचे प्रश्न अजूनही राहिले असल्यामुळे महात्मा गांधीजींना त्यांच्यासाठी कार्य कराव लागलं. ते सोडवताना संपतराव देसाई यांनी सर्व विचारांचा अभ्यास आपल्यापुढे ठेवला. कार्ल मार्क्स पासून महात्मा गांधीपर्यंत आणि संत बसवेश्वर पासून आजतागायतचे सर्व विचार त्यांनी आपल्यापुढे ठेवले. खऱ्या अर्थाने या सर्व विचारांचे मंथन केल्यानंतर आज आपल्यासाठी गांधी विचार अजूनही महत्त्वाचा आहे हे लक्षात येते. गांधीजींचे समतेचे विचार आणि सामाजिक दृष्टिकोनातून जात-पात दूर करण्याचे प्रयत्न हे विचार भिन्न भिन्न असले तरी उद्देश एकच आहे. जसे बहुजन समाज बहुजन हिताय तत्त्वावर कार्य करतोय.Mp

जनतेसाठी सर्वसामान्यांसाठी गोरगरिबांसाठी वंचितांसाठी अशा सर्वांसाठी आपण जेंव्हा कार्य करतो. यासाठी मार्ग वेगवेगळे वापरले तरी आपले ध्येय एकच आहे. ते म्हणजे सर्व माणसांना एकत्र आणून त्यांना चांगली आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवस्था उपलब्ध करून देणे. आज इस्रायल वगैरे परकीय राष्ट्रांमध्ये काय चाललंय आपण पाहतो. संबंधित ठिकाणी युद्ध पेटली आहे. अशा आंतरराष्ट्रीय ठिकाणी महात्मा गांधीजींचे विचार महत्त्वाचे ठरणार आहेत. खुद्द भारतात आपण महात्मा गांधी गौतम बुद्ध यांना अपेक्षित असलेल्या सामाजिक, अर्थ वगैरे व्यवस्थेपासून बरेच दूर आहोत. तेंव्हा आज 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती फक्त साजरी करून चालणार नाही तर बापूजींचे विचार आणि कृती अंगीकारली पाहिजे. सामाजिक दृष्टिकोनातून बंधुभाव वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करणे आजही आवश्यक आहे, हे आपल्याला कॉ. कृष्णा मेणसे यांच्या माध्यमातून लक्षात येऊ शकते. त्यांनी सुरुवातीला स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आणि त्यानंतर गोवा मुक्ती संग्राम असो किंवा बेळगावच्या मराठी माणसांसाठी त्यांनी जी काय चळवळ सुरू ठेवली ती अत्यंत महत्त्वाची आहे. बेळगावसमोर नेहमीच एक प्रश्न असतो की आपण महाराष्ट्रात केंव्हा विलीन होणार? गेली 60-70 वर्षे सीमाप्रश्न भिजत पडला आहे. आता हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असून देखील लवकर निर्णय का होत नाही? हे मला समजत नाही. न्यायालयाचा निर्णय निश्चितपणे महाराष्ट्राच्या बाजूने होईल किंवा मराठी माणसांच्या विचाराने निर्णय होईल याची मला खात्री आहे. मात्र अजूनही निर्णय होत नसल्यामुळे हा खटला जलद गती न्यायालयात नेण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेते मंडळींनी व महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने प्रयत्न केल्यास हा प्रश्न लवकर सुटू शकतो, असे मत खासदार छ. शाहू महाराज यांनी व्यक्त केले.

सदर पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात महात्मा गांधींची प्रसिद्ध प्रार्थना व स्वागत गीताने झाली. प्रा. सुनील शिंत्रे यांनी सर्वांचे स्वागत केल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य कल्याणराव पुजारी यांनी केले, तर मानपत्राचे वाचन प्रा. सुभाष कोरे यांनी केले. त्यानंतर खासदार छ. शाहू महाराज आणि ॲड. राजाभाऊ पाटील यांच्या हस्ते कॉ. कृष्णा मेणसे यांना महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार व मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी मध्यवर्तीय म. ए. समितीच्यावतीने कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर व प्रकाश मरगाळे यांच्यासह विविध संघ संस्थांतर्फे हस्ते कॉम्रेड मेणसे व खासदार छत्रपती शाहू महाराज यांचा सत्कार करण्यात आला. महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून कॉ. कृष्णा मेणसे यांनी यावेळी समायोचीत मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. अखेर अध्यक्षीय भाषणानंतर उद्योजक सुभाष ओऊळकर यांच्या आभार प्रदर्शनाने सोहळ्याची सांगता झाली. सोहळ्यास महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक निमंत्रित आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. सोहळ्याचे सूत्रसंचालन अश्विनी पाटील यांनी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.