Saturday, December 7, 2024

/

बेळगावात शेतकऱ्यांचे आंदोलन : खाजगी कंपन्यांविरोधात शेतकऱ्यांचा निषेध

 belgaum

बेळगाव लाईव्ह : ॲग्रीगोल्ड, पीएसएलसार यासारख्या खाजगी कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी आज बेळगावमध्ये खासगी कंपन्यांविरोधात बेळगाव जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन निषेध नोंदविला. राणी कित्तूर चन्नम्मा चौकात मानवी साखळी करून निदर्शने करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले.

गेल्या ९ दिवसांपासून राज्यभरात हे आंदोलन सुरु असून याचे पडसाद आज बेळगावमध्ये देखील पाहायला मिळाले. गेल्या १० वर्षांपूर्वी गरीब आणि कष्टकरी तसेच शेतकऱ्यांचे पैसे दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून काही विमा कंपन्यांनी उकळले आहेत. याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने आदेश देत सदर विमा कंपन्यांच्या मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे व्याजासहित परतफेड करण्याचे सांगितले आहे.

परंतु या आदेशाची पायमल्ली झाली असून राज्य आणि केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून सरकार दरबारी आपल्याला न्याय मिळाला नाही, येत्या दोन दिवसात गुंतवणूकदारांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

यावेळी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. शेतकऱ्यांची फसवणूक करून कोट्यवधी रुपये खाजगी कंपन्यांनी उकळले आहेत. चिटफंडच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांची फसवणूक शेतकऱ्यांची झाली असून पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.

अशा खाजगी कंपन्यांमध्ये रक्कम गुंतवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपली आयुष्याची कमाई पणाला लावली असून असे अनेक शेतकरी देशोधडीला लागले आहेत. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खाजगी कंपन्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.