बेळगाव लाईव्ह – बेळगाव येथील जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन तर्फे दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
यावर्षीचे पुरस्कार शिक्षक दिनाचे औचित्य साधून 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जायंट्स भवन ,कपिलेश्वर मंदिराजवळ येथे वितरित केले जाणार आहेत. यावर्षीचे आदर्श शिक्षक म्हणून डॉ. बी एस नावी, प्रा. मंजुनाथ एन के, श्री ज्योतिबा शिवाजी पाटील, सौ सुधा शामराव गायकवाड, परशराम बसवंत खन्नुकर व सौ शोभा राजाराम निलजकर या सहा जणांना निवडण्यात आले आहे.
डॉक्टर नावी हे राणी चन्नम्मा विद्यापीठात वाणिज्य विभागाचे प्रमुख असून त्यांनी विजापूरच्या महिला विद्यापीठात कुलसचिव म्हणून कार्य केले आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय अध्यासनाचे ते प्रमुख आहेत. शिवाय विद्यापीठाच्या अकॅडमिक विभागाचे ते विशेष अधिकारी आहेत. यापूर्वी अनेक पुरस्कारानीं त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. मंजुनाथ हे राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या भूगोल विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून ग्रामीण भागातून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीबरोबरच आत्मविश्वास दिला आणि त्यांना शिक्षणाची द्वारे खुली केली. ते उत्तम लेखक आणि चित्रकारही आहेत .
ज्योतिबा पाटील हे दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या विविध शाळांमध्ये सेवा बजावत आहेत. गेली 25 वर्षे विनाअनुदानित तत्त्वावर ते सेवा देत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय ठेवून त्यांचे कार्य सुरू आहे.
सौ सुधा गायकवाड यानी कणकुंबी प्राथमिक शाळेत कन्नड शिक्षिका म्हणून काम केल्यानंतर प्रभु नगर, माणिकवाडी आणि सध्या किनये येथे कार्य करीत आहेत.
परशराम खनूकर
समाजसेवा हा त्यांचा पिंड असून त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी शाळांचे वर्ग बांधले . ते मुतगे येथील मराठी शाळेत कार्यरत आहेत.
सौ शोभा राजाराम निलजकर या येलुर येथील मराठी सरकारी मॉडेल स्कूल येथे कार्यरत असून त्यांनी अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले आहेत त्यामुळे त्यांचा अनेक संस्थांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.