बेळगाव लाईव्ह : राज्याच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री बदलाची चर्चा जोरदार सुरु आहे. मुडा आणि वाल्मिकी घोटाळ्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत अडकवण्याचा प्रयत्न केल्यानंतर सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्येच आता मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची इच्छा बळावत चालली आहे.
सत्ताधारी पक्षातील मुख्यमंत्रीपदाची खुर्ची डळमळीत झाली कि विरोधकांना डाव साधता येईल, यासाठी विरोधक देखील मुख्यमंत्री पदी बदल करण्यासंदर्भात वक्तव्ये करीत आहेत. हा प्रश्न जरी पक्षाच्या अंतर्गत विचाराधीन असला तरी विरोधी पक्षाकडूनच मुख्यमंत्री बदलासंदर्भात अधिक दबाव आणला जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत असून आता यामध्ये उत्तर कर्नाटकातील मंत्र्यांना मुख्यमंत्रीपदी बघण्याची इच्छा भाजपचे खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केली आहे.
खानापूरमधील एका कार्यक्रमात उपस्थिती दर्शविल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आम. विठ्ठल हलगेकर म्हणाले, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना मुख्यमंत्री पद देण्यात आल्यास आपल्याला आनंदच होईल.
उत्तर कर्नाटकातील आमदार मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले तर उत्तर कर्नाटकाचा विकास अधिक जलद गतीने होईल. यासाठी भाजप कधीच समर्थन देणार नाही. पण उत्तर कर्नाटकातील व्यक्तिमत्व आणि उत्तर कर्नाटकाचा विकास या दृष्टीने आपण वैयक्तिक रित्या मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देतो.
ते पुढे म्हणाले, मंत्री सतीश जारकीहोळी जर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले तर उत्तर कर्नाटकातील समस्या सोडविण्यासाठी ते अधिक प्राधान्य देतील. ते बेळगाव जिल्ह्यातील असून आजवर त्यांनी अनेक तळागाळातील समस्यां सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. त्यांना स्थानिक समस्यांची जाण आहे. खानापूर तालुक्याच्या विकासासाठीही ते प्रयत्न करतील, असा माझा विश्वास आहे. माझे आणि त्यांचे संबंध चांगले आहेत.
ते जर मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आनंदच होईल. काँग्रेसमधील १३६ आमदारांचा त्यांना पाठिंबा मिळाला आणि ते मुख्यमंत्रीपदी नियुक्त झाले तर बेळगावमधील व्यक्तिमत्व मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले ही बेळगावकरांसाठीही आनंदाची बातमी असेल, असे मत आम. विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले.