बेळगाव लाईव्ह :बाची -रायचूर राज्य महामार्गावर सुळगा (ता. जि. बेळगाव) येथे असलेला दुभाजक रात्रीच्या वेळी अपघाताला निमंत्रण देणारा ठरत असल्यामुळे दुभाजकाला ताबडतोब रिफ्लेक्टर बसवावेत अशी मागणी केली जात आहे.
सुळगा (हिं) गावाच्या ठिकाणी संपलेला दुपदरी रस्त्याचा दुभाजक अलीकडे रात्रीच्या वेळी धोकादायक ठरू लागला आहे.
सदर दुभाजकाच्या ठिकाणी कोणताही इशारा देणारा फलक अथवा रिफ्लेक्टर बसवण्यात आलेले नाहीत. या खेरीज या ठिकाणी पथदिपांचाही अभाव आहे. परिणामी रात्रीच्या वेळी अंधारात सुळगे गावाकडून मुख्य रस्त्यावर येणाऱ्यांना दुभाजकाचा कोपरा पटकन दिसत नाही.
या ठिकाणी सुळगा गावातील माहितीगार वाहन चालक आपली वाहने सुरक्षित हाकत असली तरी भरधाव वेगात असलेले नवखे वाहन चालक, विशेष करून दुचाकी वाहन चालकांसाठी दुभाजकाचा हा कोपरा गंभीर अपघाताला निमंत्रण देणारा ठरू शकतो.
तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित खात्याने या दुभाजकाच्या ठिकाणी रिफ्लेक्टर बसवण्याबरोबरच प्रखर प्रकाश झोताच्या पथदिपांची व्यवस्था करावी, अशी मागणी जागरूक वाहन चालकांकडून केली जात आहे.





