बेळगाव लाईव्ह:भरधाव गुड्स बोलेरोच्या ठोकरीने मॉर्निंग वाॅकसाठी जाणाऱ्या एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल शहापूर येथील महात्मा फुले रोडवर घडल्यानंतर सदर रस्त्यावर युद्धपातळीवर स्पीड ब्रेकर्स अर्थात गतिरोधक बसवण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
मॉर्निंग वॉकसाठी आपल्या घरातून बाहेर पडलेल्या संत सेना रोड येथील श्रीधर दीपक पवार (वय 43) या युवकाचा काल गुरुवारी सकाळी भरधाव गुड्स बोलेरोने ठोकल्यामुळे मृत्यू झाला. रस्ता ओलांडत असताना बोलेरोची त्याला धडक बसली. या अपघातात बोलेरो चालक कलमठ रोड येथील पारसराम सावळाराम हा देखील जखमी झाला आहे.
महात्मा फुले रोड हा दुपदरी रस्ता बसवेश्वर सर्कल (गोवावेस) येथून शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नरपर्यंत प्रदीर्घ लांबीचा आहे. सदर रस्त्यामुळे टिळकवाडी, अनगोळ, चन्नम्मानगर, उद्यमबाग, मजगाव या भागातील लोकांना फोर्ट रोड आणि राष्ट्रीय महामार्गाकडे जाणे-येणे जवळचे व सोयीचे झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर सततची रहदारी असते. त्यामुळे खरंतर या रस्त्यावर ठराविक ठिकाणी स्पीडब्रेकर बसवणे जाणे आवश्यक होते.
तथापि निर्मिती केल्यापासून आजतागायत या रस्त्यावर स्पीडब्रेकर्स अर्थात गतिरोधक बसविण्यात आलेले नाहीत. परिणामी महात्मा फुले रोडवर बहुतांश वाहनचालक आपली वाहने सुसाट हाकत असतात. त्यामुळे लोकांना हा रस्ता जपून जीव मुठीत धरून ओलांडावा लागत असतो. आता कालच्या अपघातानंतर एकही स्पीड ब्रेकर नसलेल्या दीर्घ लांबीच्या महात्मा फुले रोड या दुपदरी रस्त्यावर ताबडतोब स्पीड ब्रेकर बसवण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
विशेष करून सोशल मीडियावर त्याबाबतच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महात्मा फुले रोडवर बऱ्याच ठिकाणी स्पीडब्रेकरची नितांत गरज आहे. स्वानुभव आणि निरीक्षणाअंती असे नेहमीच दिसून येते की सकाळी 5 ते 9 या वेळेत बस, ट्रक, डंपर वगैरे सारखी अवजड वाहने तसेच ऑटो रिक्षा, छोटे टेम्पो, टू व्हीलर्स (त्यात शेतकरी, व्यापारी, कॉलेज विद्यार्थी त्यांना सोडणारे पालक) प्रचंड वेगाने 60 ते 80 इतक्या प्रचंड वेगाने गाडी हाकत असतात.
. त्यामुळे बाजूने जाणाऱ्या पादचारी, सायकलवाले आणि इतरांना ‘यमा’ पेक्षा त्यांच्या ‘वाहन हाकाटी’चीच जास्त भीती वाटते. बेळगाव महानगरपालिका, स्थानिक नगरसेवक, स्थानीक आमदार यांनी तातडीने यावर उपाय शोधून कारवाई करणे गरजेचे आहे. नाहीतर निष्पाप नाहक बळींची संख्या अशीच वाढत राहणार.अशी प्रतिक्रिया एका वाहन चालकाने व्यक्त केली आहे.
तसेच एका महिला नेटकऱ्याने शनी मंदिराजवळ सुद्धा इतकं ट्रॅफिक लागतं. रोड क्रॉस करून भाजी आणायला जायचे तर जीवात जीव नसतो. तिथे ओव्हर ब्रिज बांधून सगळा घोळ करून ठेवला आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवाची काहीच किंमत नाही??? अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.