Wednesday, September 11, 2024

/

बेळगावची लावणी गर्ल सोनी मराठीवर!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष :लहापणापासूनच नृत्य व अभिनयाची आवड आणि टीव्ही मध्ये दिसण्याची जिद्द एक दिवस खरंच त्या पायरीवर नेऊन पोहचवेल हा विश्वास खणगाव, बेळगावच्या स्नेहा अनंत नागनगौडा -पाटील हिने सत्यात उतरवला आहे. सोनी मराठी वाहिनीवर रात्री 10 वा प्रसारित होणाऱ्या “कारण गुन्ह्याला माफी नाही” या मालिकेत ती झळकली असून याद्वारे अभिनय क्षेत्रात नांव कमावण्याच्या तिच्या स्वप्नाला पंख मिळाले आहेत.

खणगाव (ता. बेळगाव) येथील प्रतिष्ठित नागरिक अनंत नागनगौडा यांची कन्या असलेल्या स्नेहा हिचे शालेय शिक्षण वनिता विद्यालय बेळगाव येथून मराठी माध्यमातून झाले असून पदवी पूर्व शिक्षण गोगटे वाणिज्य महाविद्यालयात झाले आहे. याखेरीज तिने जैन महाविद्यालयातून बीबीए पदवी संपादन केली आहे. लहानपणापासूनच नृत्य व अभिनयाची आवड असलेल्या स्नेहा हिने यापूर्वी ‘जात्री बंतू’ या कन्नड वेब सिरीजमध्ये अभिनय केला आहे.

या खेरीज नृत्य असलेली अनेक कन्नड व मराठी गाणी करण्याबरोबरच ‘सांभाळ घसरल पाय गं’ या अधिकृत गाण्यांमध्ये (ऑफिशियल सॉंग) देखील काम केले आहे. सोनी मराठीवरील “कारण गुन्ह्याला माफी नाही” ही तिची पहिलीच मालिका आहे. नृत्यात पारंगत असलेली स्नेहा गेल्या 12 वर्षापासून नृत्य क्षेत्रात कार्यरत असून लावणी नृत्यात तिचा विशेष हातखंडा आहे. बेळगावची ती अशी एकमेव मुलगी आहे की जिला लावणी नृत्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

पुणे येथे तिला हा ‘कलारत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या व्यतिरिक्त ‘कलेचे शिलेदार’ हा पुरस्कार तसेच नृत्यातील अन्य अनेक पुरस्कार स्नेहाने पटकावले आहेत. गेल्या दोन महिन्यापासून मुंबई येथे ती “कारण गुन्ह्याला माफी नाही” या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आपल्या या यशाचे संपूर्ण श्रेय स्नेहा आपले आई-वडील आणि कुटुंबीयांना देते. तसेच माजी आमदार संजय पाटील आणि   म. ए. समिती नेते सागर पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगून समस्त खणगाववासीय आणि बेळगावकरांच्या प्रोत्साहनामुळेच मी आज हे यश मिळवू शकले, असे स्नेहा नागनगौडा हिने बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.Sneha patil

बेळगावसह आजूबाजूच्या जिल्ह्यात आणि त्याच बरोबर महाराष्ट्रातही आपल्या सुंदर लावणी नृत्याने रसिकांच्या मनात घर केलेल्या स्नेहा नागनगौडा -पाटील हिची स्वप्ने फार मोठी होती. मुंबई सारख्या स्वप्न नगरीत जाऊन आपली एक ओळख बनवण्यासाठी गेली कित्येक दिवस स्नेहा हिने वाट पाहिलेली आणि आज तो दिवस आला.

तिच्यात असलेल्या कलेला घरच्यांचा पाठिंबा ही एक सगळ्यात मोठी गोष्ट आणि याच सगळ्या साथीने व विश्वासाने स्नेहा हिला सोनी मराठी वरील “कारण गुन्ह्याला माफी नाही” या मालिकेत डॉक्टर राधिका डांगर हे पात्र करण्याची संधी मिळाली आहे. एकंदर स्नेहा (गुड्डी) हिच्या या यशामुळे बेळगावच्या कलाक्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.