बेळगाव लाईव्ह : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असा जयजयकार करत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. उद्या मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलिसांनी सर्व तयारी केली असून विसर्जन मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाची मिरवणूक मार्गावर करडी नजर असणार आहे.
विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावर रॅपिड ऍक्शन फोर्सचे पथसंचलन पार पडल्यानंतर आज शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग यांच्या नेतृत्वाखाली विविध पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली.
या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबनियांग यांनी सांगितले, विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस विभागाचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या दहा दिवसात श्री गणेशोत्सव शांततेत पार पडला असून उद्या होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी एकूण 6 अधीक्षक, 31 उप अधीक्षक, 109 निरीक्षक, 130 सहायक उपनिरीक्षक, 200 हवालदार, 562 होमगार्ड, केएसआरपी तुकडी तैनात करण्यात आली आहे.
संपूर्ण शहरात 517 सीसी कॅमेरे बसविण्यात आले असून विसर्जन मिरवणुकीवर व्हिडीओ कॅमेऱ्यांसह ड्रोनची नजर असेल, असे ते म्हणाले.
गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या श्री गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी होत असून या पार्श्वभूमीवर संपूर्ण विसर्जन मिरवणूक सुरळीत आणि शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस विभागाने दक्षता घेतली आहे.