बेळगाव लाईव्ह : कारवार -गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६वर कोडीबाग येथे काळी नदीवर असलेला ४३ वर्षे जुना पूल रात्री एकच्या सुमारास कोसळला. त्याचवेळी या पुलावरून जाणारी तामिळनाडू येथील लॉरी पाण्यात नदीत कोसळली. मात्र बिट पोलिसांच्या सतर्कतेमुळे लॉरीसह नदीत पडलेल्या चालकास वाचवण्यात यश आले. रात्रीच्या वेळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे मोठी दुर्घटना टळली असून दरम्यान या दुर्घटनेत अजून काही वाहने नदीत पडली असण्याचीही शक्यता वर्तवली जात असून, शोधकार्य सुरूच आहे.
महिनाभरात पावसाने कारवार, बेळगाव आणि आजूबाजूच्या परिसरास अक्षरशः झोडपून काडले आहे. यामुळे अनेक ठिकाणी पुरसदृश स्थिती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. काळी नदीवर असलेल्या या ४१ वर्षे जुन्या ब्रिजवरुन मोठ्याप्रमाणात वाहतूक होत असते. दरम्यान एस एस एम ट्रान्सपोर्ट कंपनीची अवजड सामानाची वाहतूक करणारी लॉरी (टीएन ५२ एसी ६८८०) यावरुन जात असतांना पूल ढासळला व लॉरी थेट काळी नदीत कोसळली. यावेळी वाहनात अडकून पडलेल्या बाल मुरूगन (३७) याने प्रसंगावधान राखत लॉरीच्या केबिनची काच फोडली.
पुढे केबिन वर उभा राहून त्याने मदतीसाठी आरडाओरडा केल्याने जवळच गस्त घालणाऱ्या बिट पोलिसांनी ते ऐकले व घटनास्थळी जाऊन पाहिले. त्यानंतर तत्काळ एसपी कार्यालयात याबाबतची माहिती दिली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, अधीक्षक नारायण आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक मच्छिमार आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी बोटीच्या सहाय्याने लॉरी चालकाची सुटका केली. चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या कोसळलेल्या पुलाच्या बाजूस असलेल्या समांतर पुलावरून वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे.
काळी नदीवरील हा पूल ४१ वर्षांपूर्वी यमन इंडिया नावाच्या कंपनीने बांधला होता. यापूर्वी देखील स्थानिकांनी हा ब्रिज जीर्ण अवस्थेत असून कधीही कोसळेल अशा स्थितीत असल्याचे प्रशासनाच्या नजरेत आणून देण्याचा प्रयत्न केला होता.
पण त्याकडे कानाडोळा केला गेला व वाहतूक सुरूच राहिली. आता पूलाची डागडुजी आणि देखरेखीकडे दुर्लक्ष केलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग ६६ची कंत्राटदार असलेल्या आयआरबी कंपनीविरुद्ध कारवार शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.