Thursday, October 10, 2024

/

जनतेच्या तक्रारींना स्वतःहून प्रतिसाद देणारे बेळगावचे जिल्हाधिकारी

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : प्रशासकीय सेवेत रुजू असणारे अनेक अधिकारी हे म्हणावे तितके जनतेत रुळत नाहीत. जनतेच्या तक्रारी ऐकून घेणे, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, जनतेच्या भावनांची कदर करणे, प्रत्येकाचे म्हणणे संयमाने ऐकून घेणे या सर्व गोष्टी करण्यासाठी कित्येक अधिकाऱ्यांना तसा वेळ मिळत नाही. प्रशासकीय कामकाजात व्यस्त असणारे अधिकारी क्वचितच जनतेशी थेट भिडतात. त्यांच्याशी संवाद साधतात. कित्येक अधिकारी त्यांच्या विशेष शैलीमुळे जनतेत स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण करतात. अलीकडेच बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी रुजू झालेले मोहम्मद रोशन यांनी देखील बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी निवड झाल्यानंतर अल्पावधीतच जनतेच्या मनाचा ठाव घेतला आहे.

देशाची व्यवस्था कोणतीही असो, राजेशाही की लोकशाही, त्या व्यवस्थेत काम करणार्‍या अधिकारीवर्गावरच त्या देशाचे यशापयश अवलंबून असते. भारतातील लोकशाही तर व्यापक स्वरूपाची आहे. येथील कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ या घटकांत सर्वात मोलाची भूमिका बजावणारा मूलभूत घटक म्हणजे प्रशासकीय अधिकारीवर्ग होय. अधिकारी हा आपल्या गुणवत्तेबरोबरच इतरही गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलाच पाहिजे. कारण, बुद्धिमान, कर्तव्यदक्ष व राष्ट्रहितकारी अधिकार्‍यांमुळेच शासनातर्फे राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची अंमलबजावणी अतिशय व्यवस्थितरित्या होण्यास मदत मिळते.

प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये महत्वाचा असणारा श्रवण कौशल्य गुण हा बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांमध्ये ठासून भरलेला आहे. बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी रुजू झाल्यानंतर त्यांनी बहुतांशी सर्वांच्याच तक्रारी, समस्यां जाणून घेत उत्तम प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या दोन दिवसात त्यांची अनेक नागरिकांची, संघ-संस्था, व्यक्तींची भेट घेतली. काल शुक्रवारी एकाच दिवसात त्यांनी अंदाजे एक हजार जणांशी संवाद साधला. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या समस्या, तक्रारी, सल्ला – सूचना ऐकून घेतल्या.Dc roshan mohammad

त्यांच्या विनम्र स्वभावाचे बेळगावकर सध्या कौतुक करत असून बेळगावमधील बळ्ळारी नाला आणि खानापूरमधील वनपरीक्षेत्रांतील नागरिकांच्या समस्येवर आपल्या कार्यकाळात आपण नक्की तोडगा काढण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना दिली आहे.

एखाद्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्याने जनतेला उत्तररदायी असणे हे किती महत्वाचे आहे, हे जिल्हाधिकाऱ्यांनी पटवून दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज हजारो जण अनेक समस्या, तक्रारी, निवेदने घेऊन येतात. यातील अधिकाधिक नागरिकांची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी स्वतः धाव घेत असून जनतेच्या समस्या आणि तक्रारींमध्येच उत्तर आणि समस्येचा तोडगा लपलेला असतो. आणि एका अधिकाऱ्याने याचसाठी काम करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जनतेचे ऐकूनच घेतले नाही तर अनेक मौल्यवान संकल्पना मुकू शकतात, असे जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट मत आहे.

सध्या बेळगावचा विकास युद्धपातळीवर सुरु आहे. अशावेळी अनेकतऱ्हेच्या तक्रारीदेखील पुढे येत आहेत. विकासाच्या नावावर होत असलेला भ्रष्टाचार, दर्जाहीन कामकाजांमुळे नागरिकांचे होत असलेले हाल या सर्व गोष्टींवर अभ्यास करून बेळगावचा विकास मार्गी लावण्यात नवे जिल्हाधिकारी यशस्वी ठरतील, अशी आशा बेळगावकरांच्या मनात जागी झाली आहे. नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कामाचा वेग आणि अंदाज अशाचपद्धतीने कायम ठेवावा, आणि बेळगावकरांच्या आशा खऱ्या ठरवाव्यात, हीच अपेक्षा….!

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.