बेळगाव लाईव्ह : अपघातानंतर दुचाकी नाल्यात पडल्याने नाल्यातून पुरात वाहून गेल्याने एका युवकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण या घटनेतून बचावला आहे. शनिवारी रात्री साडे सातच्या सुमारास बेळगाव जवळील कंग्राळी खुर्द च्या मार्कंडेय नदीच्या नाल्यात घटना घडली आहे.
ओमकार पाटील वय 24 राहणार अलतगा बेळगाव असे या घटनेत नाल्यात वाहून मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. ज्योतीनाथ पाटील वय 24 हा युवक या घटनेत सुदैवाने बचावला आहे.
श्रावण मासाच्या निमित्ताने बेळगाव तालुक्यातील अलतग्याहून कंग्राळी खुर्द कडे कटिंग करायला दुचाकीवरून जात असताना दुचाकी नाल्यात कोसळून झालेल्या अपघातानंतर नाल्याच्या पाण्यातून ओमकार हा वाहून गेला होता. रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह शोधून काढण्यात एचईआरएफ टीमला यश आले आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्वीय सहाय्यक मलगौडा पाटील हे देखील घटनास्थळी तळ ठोकून होते.
रविवारी सकाळी पासूनच एसडीआरएफ आणि हिरेमठ आणि सहकाऱ्यांच्या एच ई आर एफ टीमने मृतदेह शोध कार्य राबवले होते. सकाळपासूनच घटनास्थळी पोलिस उपायुक्त पी व्ही स्नेहा यांनी भेट देऊन शोध कार्याची माहिती घेतली होती तसेच एसडीआरएफची टीम देखील या मोहिमेत कार्यरत होती.
मयत ओमकार पाटील हा वायरिंग कामाला जात होता काल शनिवारी रात्री कटिंग करण्यासाठी म्हणून तो आपल्या चुलत भाऊ ज्योतीनाथ पाटील याच्या गाडीच्या मागे बसून कंग्राळी खुर्द कडे जात होता त्यावेळी काळाने त्यांच्यावर झडप घातली. दुचाकीचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी नाल्यात पडली त्यावेळी ज्योतिनाथ पाण्याबाहेर आला आणि शुद्ध अवस्थेत ओमकार पाण्यात होऊन गेला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
घटनेची नोंद काकती पोलिसात करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त मार्टिन यांनीही मार्कंडेय नदी परिसराला भेट दिली आणि घटनेची माहिती जाणून घेतली.