Sunday, September 8, 2024

/

रस्ता, वाहन नसल्याने आजारी महिलेला चक्क 4 कि.मी. उचलून आणले

 belgaum

बेळगाव लाईव्ह :तंत्रज्ञानात विकसित होत असलेल्या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे उलटली तरी देखील ग्रामीण भागातील अनेक गावे नागरी सुविधांपासून वंचित आहेत.

याचाच प्रत्यय नुकताच खानापूर तालुक्यातील आमगाव येथे आला असून रस्ता आणि वाहनाची सोय नसल्यामुळे या गावातील एका आजारी महिलेला चक्क आपल्या खांद्यावर उचलून 4 कि.मी. चालत आणून उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्याची वेळ गावकऱ्यांवर आली.

आमगाव हे खानापूर तालुक्यातील पश्चिम भागातील अतिदुर्गम भागात अतिजंगल प्रदेशात वसलेले गाव आहे. घनदाट जंगल असल्यामुळे या गावाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे वाहनेही तिथपर्यंत पोहोचत नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, काल शुक्रवारी दुपारी आमगांव येथील महिला हर्षदा हरिश्चंद्र घाडी (वय 38) हिला दुपारी अचानक छातीत दुखून चक्कर येऊ लागली.

त्यामुळे गावातील नागरिकांनी तिला प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा श्वास अडकत असल्याने तिला उपचारासाठी खानापूरला घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र रस्ता व वाहन नसल्यामुळे तिला उपचारासाठी कसे घेऊन जायचे? हा प्रश्न होता. मात्र गावकरी हतबल झाले नाहीत. आमगाव शाळेचे कन्नड शिक्षक बाळेकुंद्री यांनी 108 या रुग्णवाहिकेला संपर्क साधून नदीच्या पलीकडे येण्यास सांगितले.Forest

त्यानंतर हर्षदा घाडी हिला लाकडाचे गावठी स्ट्रेचर तयार करून गावातील 20 ते 25 ग्रामस्थांनी आळीपाळीने तिचे ओझे वाहत नदीच्या काठापर्यंत आणले. दरम्यान 108 रुग्णवाहिका नदीच्या पलीकडे येऊन उभी राहिली होती. लोकांनी हर्षदा हिला महत्प्रयासाने नदीच्या पलीकडच्या काठापर्यंत आणले. त्यानंतर तिला रुग्णवाहिकेतून खानापूर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिचा रक्तदाब कमी झाल्यामुळे तिला अधिक उपचारासाठी बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

खानापूर तालुक्यातील अरण्य विभागातील दुर्गम भागात, आजही रस्ते, वीज तसेच इतर अन्य सुविधा नसल्याने, हा भाग नागरी सोयी सुविधा पासून वंचित आहे. आमगाव आणि दुर्गम भागातील जनतेच्या गंभीर समस्यांबाबत प्रसारमाध्यमांमध्ये अनेक वेळा व्यथा मांडण्यात आल्या आहेत. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांनी नेहमीच दुर्गम भागातील जनतेच्या जीवन मरणाच्या प्रश्नाकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळेच आमगावातील महिलेवर अशी दुर्दैवी वेळ आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.