Monday, July 15, 2024

/

समिती शिष्टमंडळाचे पालकमंत्री आणि महापालिका आयुक्तांकडे साकडे!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामकाजांतर्गत अनेक ठिकाणी फलक उभारण्यात आले आहेत. या फलकांवर केवळ कन्नड आणि इंग्लिश या भाषेत मजकूर समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र या फलकांवर मराठीत उल्लेख करण्यात आला नाही.

यामुळे सदर फलकांवर मराठी भाषेत देखील उल्लेख करण्यात यावा, मराठी भाषेतून परिपत्रके देण्यात यावीत, या मागणीचे निवेदन आज शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याकडे सादर करण्यात आले.

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती शिष्टमंडळाने सदर निवेदन सादर केले. यावेळी बोलताना रणजित चव्हाण पाटील म्हणाले, शहरात विविध ठिकाणी स्मार्ट सिटी कामकाजांतर्गत अनेक फलक लावण्यात आले आहेत. मात्र या फलकांवर मराठी भाषेत मजकूर समाविष्ट करण्यात आला नाही. अल्पसंख्यांक आयोगाच्या नियमानुसार ज्याठिकाणी 15 टक्क्यांहून अधिक अल्पसंख्यांक आहेत त्यांना त्यांच्या भाषेत परिपत्रके आणि सुविधा देणे गरजेचे आहे.Marathi

सीमाभागात ६० टक्क्यांहून अधिक मराठी भाषिक राहतात. यानुसार मराठी भाषेचा वापर प्रशासकीय पातळीवर होणे तसेच मराठी भाषेतून परिपत्रके आणि फलक लावणे गरजेचे आहे. यासाठी आज पालकमंत्री आणि मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाचा स्वीकार करून सहानुभूतीपूर्वक विचार करून अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे ते म्हणाले.

यावेळी समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, महादेव पाटील, सागर पाटील सुनील बोकडे, विराज मुरकुंबी सचिन चव्हाण( निग्रो)आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.