Monday, July 15, 2024

/

मंत्री आणि आमदारांमध्ये टीकाटिप्पणी.

 belgaum

बेळगाव लाईव्ह : चिक्कोडी लोकसभा मतदार संघात झालेल्या चुरशीच्या लढाईत जारकीहोळी घराण्यातील प्रियांका जारकीहोळी यांची खासदारपदी वर्णी लागली. मात्र निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यापासून ते मतदान पार पडेपर्यंत अंतर्गत राजकारणाला ऊत आल्याची चर्चा सुरु असून काँग्रेसमधील काही नाराज इच्छुकांच्या बाजूने काँग्रेसच्याच आमदारांनी काम करत अधिकृत उमेदवाराचा पाठिंबा काढून घेतल्याचा आरोप पुढे येत आहे.

आमदार, मंत्री सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसचे कुडची विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र तम्मण्णावर यांच्यावर थेट आरोप करत काँग्रेसमधील बंडखोर उमेदवार शंभू कल्लोळकर यांच्या बाजूने प्रचार केल्याचं वक्तव्य केलं आहे. आम. महेंद्र तम्मण्णावर यांनी निवडणुकीच्या आधी दोन दिवस संपर्कच बंद केला आणि त्यांनी शंभू कल्लोळकर यांच्याबाजूने अंतर्गत प्रचार करून काँग्रेसची मते कमी केली, परिणामी कुडची मतदार संघातून काँग्रेसला अपेक्षित मते न मिळता भाजपाला आघाडीची मते मिळाली यासाठी आम. महेंद्र तम्मण्णावर कारणीभूत आहेत, असा आरोप जारकीहोळींनी केला आहे.

जारकीहोळींनी केलेल्या थेट आरोपानंतर आमदार महेंद्र तम्मण्णावर यांनीदेखील प्रत्त्युत्तरादाखल विधान करत जारकीहोळी कुटुंबियांकडून राजकीयदृष्ट्या अनुसूचित जातीच्या नेत्यांना नेस्तनाबूत करण्यात येत असल्याचा आरोप केला. आपण बुद्ध, बसवेश्वर आणि आंबेडकरांच्या तत्वांचे पालन करतो.

त्यामुळे जिथे आपल्याला किंमत नाही त्याठिकाणी राहणे आपल्याला आवडत नाही, मी पक्षाची फसवणूक करणार नाही, मात्र सतीश जारकीहोळी हे राज्यातील प्रभावशाली नेत्यांपैकी एक असून ते आपल्याला पायदळी तुडवण्याचे काम करत असल्याचा आरोप महेंद्र तम्मण्णावर यांनी केला आहे.Satish

चिक्कोडी मतदार संघात प्रतिष्ठेची लढत देत लोकसभा निवडणुकीत जवळपास १ लाख मतांच्या घरातील मताधिक्याने काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचा विजय झाला.

परंतु या भागातून २ लाखांच्या मताधिक्क्याने विजयी होण्याची अपेक्षा असल्याचे मत सतीश जारकीहोळी यांनी निकालानंतर व्यक्त केले होते. काँग्रेसला कमी मते मिळाली यासाठी घरभेदीच कारणीभूत असल्याची टिप्पणीही त्यांनी केली होती. त्यानंतर थेट आमदार महेंद्र तम्मण्णावर यांच्यावर टीका सतीश जारकीहोळी यांनी केली. आणि आता उभयतांमध्ये यावरून आरोपांच्या फैरी झडत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.