Tuesday, July 23, 2024

/

बेळगावात भाजपचे आंदोलन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :एकेकाळी केंद्रातील काँग्रेसकडून देशावर लादण्यात आलेली आणीबाणी, तसेच घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर आणि भारतीय संविधान अर्थात घटनेचा वरचेवर केला गेलेला अवमान याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विद्यमान काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशवासीयांची माफी मागावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष बेळगाव जिल्ह्याच्यावतीने आज काँग्रेस पक्ष कार्यालयाला घेराव घालून तीव्र आंदोलन छेडण्यात आले.

शहरातील काँग्रेस पक्ष कार्यालय म्हणजे काँग्रेस भवनला आज सोमवारी सकाळी शेकडोच्या संख्येने जमलेल्या शहर व जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करून घेराव घातला. आंदोलनकर्त्यांमध्ये महिला भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग देखील लक्षणीय होता. यावेळी हातात काँग्रेस पक्षाच्या निषेधाचे फलक घेतलेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडत साऱ्यांची लक्ष वेधून घेतले होते.

आंदोलनादरम्यान बंदोबस्तासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. भाजपच्या आजच्या आंदोलनामुळे काँग्रेस भवन परिसरातील वातावरण तापले होते. तथापि आंदोलनाला उग्र वळण लागण्यापूर्वीच पोलिसांनी हस्तक्षेप करून अटक सत्र अवलंबण्याद्वारे परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.

आंदोलनस्थळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना माजी आमदार ॲड. अनिल बेनके म्हणाले की, भारतीय जनता पक्ष बेळगाव जिल्ह्याच्यावतीने बेळगाव शहरातील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज आंदोलन छेडण्यात आले. याला कारण म्हणजे इंदिरा गांधींनी आणीबाणीची परिस्थिती निर्माण करून संविधानाची हत्या केलेलं आजच्या काँग्रेस पक्षाला आठवत नाही. भारतीय संविधानाबाबत काँग्रेसचे नेते नेहमी उलट सुलट बोलत असतात. विशेष करून राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खर्गे हे उभयता भाजप देशाचे संविधान बदलून बदला घेत आहे असा आरोप वरचेवर करत असतात. मात्र प्रत्यक्षात संविधान बदलणारे कोण तर तो आहे काँग्रेस पक्ष. या देशावर खऱ्या अन्याय तेंव्हा झाला जेंव्हा आणीबाणी घोषित झाली. लाखोच्या संख्येने लोकांना कारागृहात डांबण्यात आले. त्यावेळी केंद्रातील काँग्रेसच्या कारकिर्दीत ज्या पद्धतीने संविधानाची हत्या झाली त्याबद्दल न बोलता काँग्रेस नेते आता भारतीय जनता पक्षावर आरोप करत आहेत. यासाठीच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खर्गे, राहुल गांधी या नेते मंडळींनी जनतेची जाहीर माफी मागावी. कारण एकेकाळी काँग्रेसकडून देशावर लादण्यात आलेल्या आणीबाणीबद्दल गेल्या 40-50 वर्षात कोणत्याही काँग्रेस नेत्याने जनतेची माफी मागितलेली नाही. आणीबाणीच्या काळात हिंदुत्ववादी नेते आणि कार्यकर्त्यांना कारागृहात डांबून त्यांचा छळ करण्यात आला होता. या सर्व गोष्टींबद्दल राहुल गांधी व खर्गे यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, या मागणीसाठी आज आम्ही हे आंदोलन केलं होतं जे यशस्वी झाले आहे.Bjp

आता उद्या आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे बेळगावमध्ये काळा दिन पाळणार आहोत अशी माहिती देऊन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेंव्हा जेंव्हा आपल्या पदाची शपथ घेतली त्यावेळी सर्वप्रथम संविधानाला नमस्कार केल्याशिवाय कधीही शपथ घेतलेली नाही. याउलट काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही नेत्याने शपथ घेण्यापूर्वी संविधानाला नमस्कार केलेले आजपर्यंत आम्ही पाहिलेले नाही. एकूणच काँग्रेस पक्षाने आजपर्यंत देशावर जो अन्याय केला आहे. संविधानामध्ये जे बऱ्याचदा बदल केले आहेत, त्याचे आजच्या काँग्रेसने त्यांनी पुनरावलोकन करावे हा देखील आजच्या आमच्या आंदोलनाचा उद्देश होता, असे माजी आमदार बेनके यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार संजय पाटील यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका करताना ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा, देशाच्या संविधानाचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला संविधानाबद्दल बोलण्याचा अजिबात अधिकार नसल्याचे सांगितले. त्यासाठीच एकेकाळी देशावर आणीबाणी लागणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार करण्यासाठी भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरला आहे. या देशाची घटना येथील हिंदू धर्म संस्कृती जोपासण्याचे काम स्वच्छ प्रतिमेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय जिद्दीने व हिरीरीने करत आहेत.

त्यांना अडथळे निर्माण करण्याचे काम कांही मंदबुद्धीचे काँग्रेस नेते करत आहेत. तेंव्हा त्यांना हात जोडण्याचं किंवा त्यांच्याशी हात मिळवण्याचं पाप देशातील हिंदू बांधवांनी किंवा हिंदू संस्कृती मानणाऱ्या जनतेने करू नये अशी माझी प्रामाणिक भावना आहे, असेही माजी आमदार पाटील पुढे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.