बेळगाव लाईव्ह :लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज मंगळवारी सकाळी अचानक बेळगाव महापालिकेमध्ये अचानक धाड टाकून चौकशी व कागदपत्रांची तपासणी सुरू केल्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणून त्यांची पाचावर धारण बसली.
लोकायुक्त एसपी हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी सकाळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी महापालिकेवर धाड टाकली. या धाडीमध्ये हनुमंतराय यांच्या समवेत 10 लोकायुक्त अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते. महानगरपालिकेमध्ये आपल्या विविध कामांसाठी अनेक नागरिक आलेले असताना दुपारी 1:30 वाजले तरी संबंधित मनपा अधिकाऱ्यांचा त्यांच्या कार्यालयात पत्ता नव्हता.
ही बाब लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर एकेक अधिकारी महापालिकेत येऊ लागताच लोकायुक्त अधिकाऱ्यांनी त्यांची चांगलीच कान उघडणी केली. जन्म -मृत्यू दाखले देणाऱ्या कार्यालयात लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैशाची लूट केली जाते हे लक्षात घेऊन लोकायुक्त अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी चौकशीसह कागदपत्रांची तपासणी केली. तसेच जादा पैशाची आकारणी का केली जाते? जमा केलेल्या पैशाची पावती का दिली जात नाही? असा जाबही विचारला.
तेंव्हा उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना समर्पक उत्तर देता आले नाही. चिल्लरची समस्या असेल तर क्यूआर कोड बसून घ्या, अशी ताकीद लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दिली. त्याचप्रमाणे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राचा दर लोकांना दिसेल या पद्धतीने कार्यालयाच्या दर्शनीय भागी लावण्याची सूचनाही त्यांनी केली.
महापालिकेतील पर्यावरण आरोग्य शिक्षण अभियांत्रिकी या विभागांसह पावती केंद्राला भेट देऊन लोकायुक्त अधिकाऱ्यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.
दरम्यान महापालिका आवारात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना एका नगरसेवकांनी सांगितले की, बेळगाव महापालिकेच्या बाबतीत आम्ही यापूर्वी लोकायुक्तांकडे अनेकदा तक्रारी करून चौकशीची मागणी केली होती. कारण की भाजप, काँग्रेस कोणाचेही सरकार येऊ दे या ठिकाणीचे अधिकारी तेच राहतात बदलत नाहीत. हे अधिकारी सरकारच्या हातचे बाहुले बनवून ते सांगतील तसे वागत असतात.
त्यामुळे नेते, लँड माफियांकडून बेळगाव महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार भ्रष्टाचार केला गेला आहे. त्यामुळे आम्ही कांही चार-पाच गंभीर प्रकरणांची लोकायुक्तांकडून चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज महापालिकेला भेट दिली असली तरी तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार न करता येथील सर्व गैरप्रकार व घोटाळ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. महापालिकेतील अधिकारी राज्यातील सध्याच्या काँग्रेस सरकारच्या हातचे बाहुले झाले आहेत.
आम्ही महापौरांच्या नेतृत्वाखाली महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी द्यावी. आम्ही आचारसंहितेचे उल्लंघन न करता ही सहभाग घेऊ अशी लेखी मागणी केली आहे. मात्र आम्हाला ही सभा घेण्यास परवानगी दिली जात नाही आहे. नागरिकांना जन्म मृत्यूचा दाखला तसेच अन्य कागदपत्रे देण्यासाठी जादा पैसे उकळले जातात. या संदर्भातही आम्ही लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे.
महापालिकेच्या महसूल, टाऊन प्लॅनिंग, आरोग्य वगैरे सर्व विभागात सरकारच्या संगनमताने अधिकारीवर्ग मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार गैरव्यवहार करत आहे. याच्या चौकशीची मागणी आम्ही केली आहे. बेळगाव महापालिकेत आज लोकायुक्तांकडून चौकशी होत आहे.
भविष्यात सीबीआय वगैरे राष्ट्रीय संस्थानकडून ही चौकशी झाली तरी आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही असे सांगून तथापि बेळगाव महापालिकेतील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची सखोल चौकशी न झाल्यास आम्ही उग्र आंदोलन छेडू असा इशारा संबंधित नगरसेवकाने दिला.
दरम्यान बेळगाव मनपात मंगळवारी संध्याकाळ पर्यंत चौकशी करण्यात आली. त्याचा अहवाल आता वरिष्ठांना पाठवण्यात येणार आहे